चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु असताना पाकिस्तानात भीषण बॉम्ब स्फोट; आत्मघाती हल्ल्यात ५ जण ठार; २० जण जखमी

1 min read

इस्लामाबाद दि.२८:- पाकिस्तान आत्मघाती स्फोटाने हादरला आहे. पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात असलेल्या मशिदीमध्ये शुक्रवारी जोरदार स्फोट झाला. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागात असलेल्या मशि‍दीमध्ये झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात पाच लोक ठार झाले असून अनेक लोक जखमी झालेत. सुसाईड बॉम्बरने शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी मशिदीच्या मुख्य हॉलमध्ये स्फोट घडवून आणला. हल्लेखोराने नमाज संपताच स्वत:ला उडवले. या हल्ल्यात पाकिस्तानातील फादर ऑफ तालिबान मौलाना समी-उल हक यांचा मुलगा मौलाना हमीद उल हक हक्कानी याचाही या हल्ल्यात मृत्यू झाला.शुक्रवारी नमाज सुरु असताना आत्मघाती स्फोट घडवण्यात आला. नमाजावेळी मशिदीत मोठी गर्दी होती. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. बॉम्ब स्फोटाची घटना घडल्यानंतर पेशावरमधील लेडी रीडिंग रुग्णालयाला अलर्ट देण्यात आला आहे. हे रुग्णालय स्फोट झालेल्या मशिदीपासून ४५ मिनिटांवर आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. वैद्यकीय आणीबाणीची घोषणा करण्यात आलेली आहे.

या आत्मघाती बॉम्ब स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक जुल्फिकार हमीद यांनी दिली. स्फोट झालेल्या ठिकाणी सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. आसपासच्या भागांमध्ये झडती घेतली जात आहे. फॉरेन्सिकचं पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. रमझान महिना सुरु होण्याआधीचा हा शेवटचा शुक्रवार होता. त्यामुळे मशिदीत बरीच गर्दी होती. मशीद मदरशाच्या परिसरात आहे. त्या मदरशात राहणारे विद्यार्थी सुट्ट्यांवर जाण्यास निघाले होते. त्याचवेळी हा स्फोट झाला. स्फोट झाला तेव्हा मशिदीच्या आत मोठ्या संख्येने लोक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.मौलाना हमीद उल हक हक्कानी यांच्या सुरक्षेसाठी १० ते १५ जण तैनात करण्यात आले होते. या बॉम्बस्फोटात हे लोक जखमीही झाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे