लेकरं सारखं विचारताहेत ‘पप्पा घरी कधी येणार?’; शहीद जवानाच्या पत्नीचा काळीज पिळवटणारा हंबरडा

1 min read

गडचिरोली दि.१३:- ‘कालपासून लेकरं विचारताहेत पप्पा कधी येणार, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही… मी त्यांना काय उत्तर देऊ, तुम्हीच सांगा…’ अशा काळीज हेलावून टाकणाऱ्या शब्दांत शहीद जवान महेश कवडू नागुलवार (३९) यांच्या पत्नी पल्लवी यांनी टाहो फोडला.

माओवाद्यांविरुद्धच्या चकमकीत मंगळवारी वीरगती प्राप्त झालेले जवान महेश नागुलवार यांना बुधवारी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. नागुलवार सी-६० या नक्षलविरोधी पथकात होते. बुधवारी सकाळी उत्तरीय तपासणीनंतर पार्थिव जिल्हा मुख्यालयात नेण्यात आले. नागुलवार यांच्या आई कुंदा, पत्नी पल्लवी, आद्वी (वय ११) व आश्वी (वय ५) या दोन मुली व नातेवाइकांनी एकच आक्रोश केला.महेश यांच्या वडिलांच्या निधनानंतर आई कुंदा यांनी संसार सावरला. महेश यांनी पोलिस दलात भरती होऊन आईचे परिश्रम सार्थकी लावले. पण ऐन उमेदीच्या काळात त्यांना हौतात्म्य आल्याने कुटुंबावर आघात झाला. ‘माझा बापू कुठं गेला रं… आम्ही कसं राहावं जी..’ अशा शब्दांत महेश यांच्या आईने हंबरडा फोडला.

कुटुंबीयांना २ कोटींची मदत : मुख्यमंत्री फडणवीस

नक्षलमुक्त भारताच्या अभियानात नागुलवार यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.नागुलवार यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारची मदत व विविध लाभांसह २ कोटी रुपये अर्थसाहाय्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे