‘शुभम तारांगण’ सोसायटीमधील महिलांनी गिरवले योगाभ्यासाचे धडे

आळेफाटा दि.५: आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने ‘शुभम तारांगण’ सोसायटी आळेफाटा येथे खास महिलांसाठी “आनंद अनुभूती शिबिराचे” आयोजन केल्याचे शिबिराचे आयोजक व आर्ट ऑफ लिव्हिंग चे योग प्रशिक्षक प्रा. डॉ. अरुण गुळवे यांनी सांगितले. शिबिरामध्ये ४० महिलांनी सहभाग नोंदवला. या शिबिरामध्ये सहभागी महिलांनी प्राणायाम, योगासने आणि ध्यान यासारख्या विविध प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य विषयक गोष्टी जाणून घेतल्या. तसेच श्वासावर आधारित असलेली सुदर्शन क्रिया देखील या शिबिरात शिकविली गेली.
शिबिरादरम्यान नाडी परीक्षा शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. अहिल्यानगर येथील नाडी परीक्षा तज्ज्ञ डॉ. रोहिणी गवळी यांनी सहभागी साधकांचे नाडी परीक्षण करून त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. या शिबिरामुळे ऊर्जेची पातळी वाढून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आनंदी आणि सकारात्मक
झाल्याचे सहभागी महिला शिबिरार्थींनी आपल्या मनोगतात आवर्जून सांगितले. शिबिर आयोजन करण्यासाठी महिला स्वयंसेविका निकिता घोंगडे, पल्लवी उदमले, संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि सर्व संचालक मंडळाने सहकार्य केले. योग प्रशिक्षक म्हणून प्रा . डॉ. अरुण गुळवे, सचिन शेरकर, प्रतिभा शेरकर, तुषार झोपे यांनी कामकाज पाहिले.