एकनाथ शिंदे यांची प्रकृती पुन्हा बिघडली; ठाण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल
1 min readठाणे दि.३:- काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्यानं वैद्यकीय तपासणीसाठी ते ठाण्यातील रुग्णालयात पोहोचले आहेत. डॉक्टरांनी त्यांना प्रकृतीची संपूर्ण तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी त्यांना अॅडमिट करून घेतलं जाण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात सध्या नव्या सरकारच्या स्थापनेची लगबग सुरू आहे. नवे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या ते काळजीवाहू मुख्यमंत्र्याच्या भूमिकेत आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार नाहीत हे स्पष्ट झाल्यानंतर आता त्याची सरकारमधील भूमिका काय असेल, याविषयी उत्सुकता आहे. नव्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होणार की केंद्रात मंत्रिपद स्वीकारणार याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहेत. दिल्ली दरबारी या संदर्भात काही बैठकाही झाल्या. मात्र, त्यात ठोस तोडगा निघाला नसल्याचं समजतं.राज्यात नवं सरकार कधी स्थापन होणार याविषयी चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदे दोन दिवसांपूर्वी गावाला निघून गेले होते. त्यांची प्रकृती बिघडल्याचं सांगण्यात आलं. दरे गावी दोन दिवस राहिल्यानंतर एकनाथ शिंदे पुन्हा मुंबईत परतले. त्यामुळं सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल असं वाटत असतानाच शिंदे आज रुग्णालयात गेले आहेत. एकनाथ शिंदे यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी करण्यात आली असून त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या पांढऱ्या पेशी कमी-जास्त होत आहेत. त्यामुळं त्यांना अजूनही उपचाराची गरज आहे. सततच्या तापामुळं अँटी बायोटिक सुरू आहेत. त्यामुळं त्यांना अशक्तपणा आला असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. आता ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांची टीम त्यांची तपासणी करणार आहे.