ऊस क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या जुन्नर च्या विकास चव्हाण यांना ‘महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार २०२५’
1 min read
पारगाव तर्फे आळे दि.३१:- जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे येथील कृषी पदवीधर विकास हरिभाऊ चव्हाण यांना ऊस क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी “महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला आहे. दिनांक ३० मे २०२५ रोजी नाशिक येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परिसरात पार पडलेल्या
विशेष समारंभात हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कृषी भूषण एफपीओ स्टार्टअप फेडरेशन तर्फे देण्यात आला.पुरस्कार प्रदान समारंभात मा. प्रा. संजीव सोनवणे (कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक) यांच्या शुभहस्ते आणि मा. डॉ. सूर्या गुंजाळ (वैज्ञानिक सल्लागार, जैवविविधता प्रकल्प,
मेघालय), अभिमन्यू काशिद (प्रकल्प संचालक, आत्मा कृषी विभाग, नाशिक) व भूषण निकम (अध्यक्ष, कृषी भूषण महाराष्ट्र स्टार्टअप फेडरेशन) यांच्या प्रमुख उपस्थितीत विकास चव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचे ऊस क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान आहे.
विकास चव्हाण यांनी स्वतःच्या शेतीत ऊस उत्पादनाच्या बाबतीत नवनवीन प्रयोग करून सातत्याने विक्रमी उत्पादन घेतले आहे. सलग सात वर्षे एक एकरात शंभर टनांपर्यंतचे ऊस उत्पादन घेण्याचा त्यांनी विक्रम केला आहे. या अनुभवातून त्यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचे उत्पादनही वाढवले आहे.
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना आणि कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांनी उस खोडवा पाचट व्यवस्थापन चळवळ सुरू केली. तसेच शेतकऱ्यांना घरच्या घरी ऊसाची रोपे तयार करता यावीत म्हणून सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसार राज्यभर केला. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न दोन्ही वाढले.
विकास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वतःच्या शेतावर २५ पेक्षा जास्त शेतकरी मेळावे, शेती शाळा व चर्चासत्रे आयोजित केली आहेत. त्यांच्या प्रयत्नांतून अनेक नवतरुण शेतीत उतरून यशस्वी शेती व्यवसाय करत आहेत. विकास चव्हाण यांना आजवर ५० हून अधिक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
त्यात संशोधन संस्था, साखर कारखाने, प्रसार माध्यमे तसेच नामवंत संस्थांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागाने त्यांना ‘कृषीनिष्ठ पुरस्कार’ देऊन गौरविले आहे. विकास चव्हाण यांचे कार्य हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असून, त्यांनी केलेली ऊस क्षेत्रातील क्रांती संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.
