पुणे दि.३ :- राज्यभरातील २२०० नायब तहसीलदार आणि ६०० तहसीलदार यांनी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. राजपत्रित वर्ग-२ नायब तहसीलदार या कार्यकारी पदाच्या विद्यमान ग्रेड-पे मुद्यावरुन हा संप पुकारण्यात आला आहे. नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचे असले तरी या पदाला इतर विभागांतील समकक्ष वर्ग दोनच्या पदापेक्षा कमी वेतन मिळते. त्यामुळे ग्रेड पे ४३०० रुपयांवरुन ४८०० रुपये वाढवण्याची त्यांची मागणी आहे.
दरम्यान राज्य सरकारने १३ ऑक्टोबर १९९८ रोजी नायब तहसीलदार संवर्गाचा दर्जा वर्ग तीनवरुन वाढवून वर्ग दोन केला होता. मात्र वेतनवाढ केली नव्हती. मागील २५ वर्षांपासून राज्यातील नायब तहसीलदार वर्ग दोन या पदावर काम करतात, मात्र वर्ग तीनचे वेतन घेत आहेत. त्यामुळे नायब तहसीलदारांनाही इतर विभागांतील वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांएवढा ग्रेड पे वाढवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने केली आहे.
वाढीव ग्रेड पे मागणी मान्य झाल्यास राज्यातील २२०० पेक्षा जास्त नायब तहसीलदारांना फायदा होईल तर दुसरीकडे सरकारच्या तिजोरीवर प्रतिवर्ष २.६४ कोटी रुपयांचा बोजा वाढेल. परंतु या आंदोलनामुळे राज्यातील महसूल विभागातील शासकीय यंत्रणा कोलमडणार असून याचा फटका मात्र, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना बसणार आहे.