मुंबई-पुणे महामार्गावर टेम्पो- खासगी बसचा भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली; काही प्रवाशी जखमी
1 min readखोपोली दि .२१:- मुंबई-पुणे महामार्गावर मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास खासगी बसला टेम्पोने धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. टेम्पोने धडक दिल्यानंतर बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या २० फूट खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. या बसमधून ११ प्रवासी प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा बोरघाटात मध्यरात्री तीनच्या सुमारास अपघात झाला. सांगोला ते मुंबई ही खाजगी बस निघाली होती. यावेळी कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोने मागून धडक दिल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस मार्ग सोडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या २० फूट खोल खड्ड्यात कोसळली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बसमधील काही प्रवासी यात जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त बसमधून प्रवासी सांगोला ते मुंबई प्रवास करत होते.या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी आयआरबी देवदूत पथक, खोपोली अपघातग्रस्तांना मदत करणारी टीम आणि महामार्ग पोलीस दाखल झाले. त्यांनी बसमधील अडकलेल्या बस चालकांसह प्रवाशांना सुखरूपणे बाहेर काढले. त्यानंतर जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, खंडाळा घाटात अनेक ठिकाणी खोल दरी आहेत, मात्र हा अपघात जिथं झाला, तिथं २० ते २५ फुटाचा खड्डा असल्याने बस थेट तिथेच जाऊन कोसळली.