कोट्यवधींची रोकड खेड-शिवापूर टोलनाक्यावर जप्त
1 min readपुणे, दि. २१- विधानसभा निवडणुकीच्या खेड-शिवापूर पार्श्वभूमीवर टोलनाक्यावर रोकड घेऊन जाणारे वाहन राजगड पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले. या वाहनात ५ कोटींची ही रक्कम असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ही रक्कम कोणाची? कुठे चालली होती? याबाबत राजगंड पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे.याप्रकरणी शहाजी नलावडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो महायुती सरकारमधील बड्या नेत्याचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे- सातारा महामार्गावर एका वाहनातून रोख रक्कम घेऊन जाणार असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राजगड पोलिसांनी दुपारपासून खेड-शिवापूर टोलनाक्यावर सापळा रचला होता. सायंकाळी सहाच्या सुमारास एक संशयित वाहन टोलनाक्यावर आले. यावेळी वाहनाची तपासणी केली असता त्यात कोट्यवधींची रोख रक्कम असल्याचे आढळले. यावेळी पोलिसांनी संबंधित वाहन पोलीस चौकीला आणून त्यातील रोकड जप्त केली. वाहनातील चार जणांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर खेड-शिवापूर पोलीस चौकीत वरिष्ठ पोलीस आणि महसूल अधिकारी दाखल झाले आहेत. वाहनातील रकमेची शहानिशा करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, ही रोकड सापडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची एक्सवर द्वीट करीत महायुतीच्या बड्या नेत्याला लक्ष्य केले.