करणी केल्याच्या संशयावरून खून; अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले गावात प्रबोधन

1 min read

पुणे दि.२१:- करणी, भूत, भानामती – ही अंधश्रद्धाच आहे, हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी हाथवे या गावात समजावून सांगत प्रबोधन केले.हाथवे हे पुण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर असलेले एक छोटेसे खेडेगाव. हे गाव अतिशय दुर्गम भागात आहे. या गावात २२ सप्टेंबर रोजी गेनबा खुटवड नावाच्या वृद्धाचा खून झाला. हा खून त्याच्याच नात्यातील स्वप्नील खुटवड या २५ वर्षे वयाच्या तरुणाने केला. करणी केल्याच्या संशयावरून खून केल्याचे तपासातून निष्पन्न झाले.ही वार्ता समजल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शाखेच्या कार्यकर्त्यांनी या गावाला भेट दिली. तेथील सरपंच आणि गावकर्यांशी संवाद साधला. त्यांच्याच मदतीने करणी, भूत, भानामती या अंधश्रध्दा असून, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करावा, असा संदेश देणारा फ्लेक्स चावडीवर आणि चौकात लावला.त्याआधी राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गवळी यांची भेट घेतली. या प्रकरणात जादू टोणाविरोधी कायद्याचे कलम लावणे कसे आवश्यक आहे. हे त्यांना पटवून दिले. त्यांना विवेकाचा जागर हे पुस्तक भेट दिले. ग्रामीण भागातील लोकांचे प्रबोधन करण्याच्या या उपक्रमात नंदिनी जाधव, श्रीपाल ललवाणी, वसंत कदम, प्रकाश भारद्वाज यांनी सहभाग घेतला होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे