कल्याण-अहमदनगर महामार्गाचे संरक्षक कठडे काढण्याचा प्रयत्न
1 min read
गुंजाळवाडी दि.८:- अपघात प्रवण असणाऱ्या गुंजाळवाडी (ता. जुन्नर) येथून कल्याण अहमदनगर महामार्गावरील पुलाजवळ असणाऱ्या पूर्वेकडील
बाजूचे उत्तरेकडील रस्त्याच्या कडेचे संरक्षक कठडे चोरण्याचे किंवा काढण्याचे काम दिवसाढवळ्या चालू असून, अपघातास निमंत्रण देणारे हे काम असून महामार्ग प्रशासनाला थांग पत्ता नाही.
कल्याण-अहमदनगर महामार्ग क्रमांक ६१ हा जवळपास ७५८ किलोमीटर लांबीचा असून वाहतूक आणि प्रवासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे,
या महामार्गावर रात्रंदिवस वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात चालू असते तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस व खाजगी बसेसही मोठ्या प्रमाणात प्रवाशांना घेऊन धावत असतात.
पुलाच्या पूर्वेकडील व महामार्गाच्या उत्तरेकडील दगडू शिवाजी गुंजाळ यांच्या दुकानासमोरील रस्त्याच्या कडेचे संरक्षक कठडे दिवसाढवळ्या काढण्याचे काम
अज्ञात व्यक्तीकडून चालू असून; या संरक्षक कठडे काढण्याच्या कामाला प्राधिकरणाची परवानगी आहे का? नसल्यास कोणाच्या अधिकारात काढले जात आहेत असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.सदर कल्याण अहमदनगर महामार्गाच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले की; कल्याण अहमदनगर महामार्गाचे संरक्षक कठडे काढण्याचा कोणताही प्रस्ताव नसून;
जर कोणी असे काही करत असेल तर शासकीय मालमत्तेचे नुकसान व चोरी असे गुन्हे दाखल केले जातील आणि सदर व्यक्तीला नोटीस जारी करून त्याच्याकडून परत असे करणार नाही असे लेखी स्वरूपात घेतले जाईल व संरक्षक कठडे कायमस्वरूपी वेल्डिंग केले जातील.
परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे या महामार्गाकडे म्हणावे असे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गुंजाळवाडी येथील याचाही खुलासा होणे गरजेचे आहे. वळणावर असलेले संरक्षक कठडे काढल्यामुळे अपघातास निमंत्रण मिळणार असून.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे किंवा यामध्ये काही साटे-लोटे झाले असावे अशी शंका स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.