यादववाडीत सुवर्णमहोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह

बेल्हे दि.४: यादववाडी (बेल्हे) येथील श्रीहनुमान जन्मोत्सवानिमिताने अखंड हरिनाम सप्ताहाचे यंदाचे सुवर्ण महोत्सवी ५० वे वर्ष असून या हरिनाम सप्ताहाची सुरुवात ह.भ.प कोंडाजीबाबा डेरे यांच्या आशीर्वादाने यादववाडी येथील रहिवासी ह.भ.प रखमाजी बाचा यादव यांनी केली असल्याची माहिती मच्छिंद्र लामखडे व स्वप्निल गायकवाड यांनी दिली.वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला मोठे महत्व आहे. यामध्ये सात दिवस विविध प्रकारच्या संत वाङमयाचा अभ्यास करणाऱ्या हरिभक्त परायण महाराजांकडून संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराम पर्यंत विविध संतांच्या रचना असलेल्या अभंगावर तत्वचिंतन करण्यात येते.
या तत्त्वचिंतनातून मनुष्य जन्मात ईश्वर नामाचे काय महत्व आहे याविषयी सखोल चिंतन केले जात असून, यादववाडी येथे होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये शनिवार (दि.५ मार्च) पासून हभप योगेश महाराज शिंदे, पांडुरंग महाराज घुले, केशव महाराज हगवणे, अशोक महाराज जाधव,
राजाराम महाराज जाधव,संतदास महाराज मनसुख, मधुसूदन महाराज मोगल यांच्यासह विकासानंद महाराज मिसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.सप्ताह काळात दररोज सकाळपासूनच धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असून पहाटे चार ते सहा काकड आरती, सात ते नऊ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,
नऊ ते अकरा गाथाभजन, सायंकाळी सहा ते सात हरिपाठ, सात ते नऊ हरिकीर्तन व नऊ नंतर दानशूर अन्नदात्यांकडून महाप्रसादाचे आयोजन केले जाणार असून, सर्व जनतेत धर्म जागृती व्हावी या हेतुने सर्व भाविकांनी या अखंड हरिनाम यज्ञात सहभागी व्हावे, असे आवाहन मच्छिंद्र लामखडे यांनी केले आहे.