यंदा ‘मे’ महिन्यात पावसाचा उच्चांक, देशभरात या काळात तब्बल ‘इतका’ टक्के जास्त पाऊस
1 min read
पुणे दि.१:- देशात मे महिन्यातील पावसाने विक्रम केला असून देशभरात मे महिन्यात तब्बल 42 टक्के जास्त पाऊस झाला आहे. 1901 पासूनच्या नोंदीनुसार राज्यात मे महिन्यातील पावसाची सरासरी 14.4 टक्के आहे. परंतु यंदा तब्बल 159.4 मिलिमीटर पाऊस पडला आहे. हा पाऊस एकूण सरासरी पेक्षा 11 पट जास्त आहे. मे महिन्यात महाराष्ट्रातील सर्वच भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे भर उन्हाळ्यात नदी नाल्यांना पूर आला. धरणांमध्ये जलसाठा वाढला आणि धबधबे वाहू लागले. देशभरातील मार्च ते मे या तीन महिन्याची सरासरी पहिल्यास 42 टक्के जास्त पाऊस झाला आहे.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मे महिन्यात बदल दिसून आला.या दोन्ही समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. यामुळे महाराष्ट्रासह देशभरामध्ये दमदार पाऊस झाला. मे महिन्यात कडक ऊन असते. तापमान वाढलेले असते. राज्यातील अनेक शहरांमध्ये 40 अंशाच्या वर तापमान असते.
परंतु यंदा मे महिन्यात कमाल तापमानात मोठी घट झाली. हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत पुढील चार दिवस पावसाचा इशारा दिला असून पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये 1 ते 4 जूनदरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातही या काळात पाऊस पडणार आहे.