आणे येथे मोफत सर्व रोग निदान शिबिरात १५३ जणांची तपासणी
1 min read
आणे दि.२८:- महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत या उपक्रमाअंतर्गत आणे (ता. जुन्नर) येथे मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातील व परिसरातील १५३ नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. श्रीरंगदास स्वामी महाराज सांस्कृतिक भवन येथे हे शिबिर घेण्यात आले. मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान संचलित “मातोश्री आयुर्वेदिक कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर” च्या माध्यमातून आयोजित केलेल्या या शिबिरात कॉलेजचे डॉ. विनोद कराळे, डॉ. वैभव गाडगे, डॉ. पल्लवी फापाळे व डॉ. शितल भुईगळ यांनी रुग्णांची तपासणी केली.
तसेच १३ वैद्यकीय विद्यार्थी, १३ विद्यार्थीनी व दोन परिचारिका यांनी सहभाग घेऊन रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात डोळ्यांचे विकार, मधुमेह, रक्तदाब, स्त्रियांचे आजार तसेच आयुष्यमान भारत योजने अंतर्गत येणाऱ्या अनेक आजारांची तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानचे किरण आहेर, गावच्या माजी सरपंच डॉ. श्वेतांबरी आहेर,डॉ.दीपक आहेर, श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थान संस्थेचे अध्यक्ष मधुकर दाते, खजिनदार रंगनाथ आहेर, विश्वस्त रंगनाथ दाते, तंटामुक्ती अध्यक्ष किशोर आहेर, सचिन दाते आदी मान्यवर उपस्थित होते.