ग्रामीण भागात वाढले महिलांच्या स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण

1 min read

पुणे दि.२१: – शहरी भागासह आता ग्रामीण भागातही कर्करोगाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामध्ये २० ते २२ वयोगटातील तरुण स्त्रिया या आजाराने ग्रस्त असल्याचे दिसून येते. त्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी वेळच्या वेळी चाचणी करून घेणे आवश्यक आहे. असा सल्ला टीजीएच ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरच्या सर्जिकल कर्करोगतज्ज्ञ डॉ. मृणाल परब यांनी दिला. ऑक्टोबर महिना पिंक अवेरनेस महिना (स्तन कर्करोग जागरूकता) पाळला जातो. आज कर्करोगाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार देशभरात साडेबारा लाख नवे कर्करुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ८ लाख लोकांचा मृत्यू झाला असून, ५ लाख रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये महाराष्ट्रात कर्करोगाचे प्रमाण लक्षवेधी आहे. त्यामध्ये महत्त्वाचे कारण म्हणजे कर्करोगाची वेळोवेळी तपासणी न करणे. त्यामुळे कर्करोग अंतिम टप्प्यात आल्यावर त्याचे निदान होते आणि उपचार करणे शक्य होत नाही. त्यामुळे वेळीच चाचणी केली, तर उपचार करणे शक्य होईल आणि रुग्ण बरा होऊ शकतो.

घरीच करा प्राथमिक कर्करोग तपासणी

घरच्या घरी अत्यंत सोप्या पद्धतीने काही मिनिटांतच स्वयं स्तन तपासणी करता येऊ शकते. यामुळे स्तनांच्या कॅन्सरचे निदान लवकर होण्यास मदत होईल. एखाद्या स्त्रीचे वय २५ वर्षांपेक्षा अधिक असेल आणि तिला स्तनात गाठ जाणवत असेल अथवा स्तनाग्रात बदल जाणवला असेल किंवा स्त्राव होत असेल. तर अशा परिस्थितीत त्वरित कॅन्सरची चाचणी करावी, असा सल्ला परब यांनी दिला. एक्स-रे मॅमोग्राफी, सीटी आणि पीईटी स्कॅन यासारख्या चाचण्यांद्वारे स्तनामधील दोष शोधले जाऊ शकतात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे