राज्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्यास मंजूरी

1 min read

मुंबई दि.२५:- राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासासाठी सुमारे ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या बृहद आराखड्याला मंगळवार दि.२४ रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. तसेच राज्यातील विविध तीर्थस्थळ आणि पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तातडीने नियोजन करण्यात यावे. आणि या सर्वच ठिकाणची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत याची काळजी घ्यावी असे निर्देश यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.शिखर समितीच्या बैठकीत ‘या’ आराखड्यांना मान्यता :१) श्री क्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप व दर्शन रांग या सुविधेसाठी १२९ कोटी ४९ लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता.

२) भगूर (जि. नाशिक) येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित थीमपार्क साकारण्यात येणार आहे. त्यासाठीच्या ४० कोटी रुपयांच्या प्रस्तावास तसेच पहिल्या टप्प्यातील १५ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.३) अमळनेर (जि. जळगांव) येथील देशातील एकमेवाद्वितीय अशा मंगळग्रह देवस्थानाच्या २५ कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. ४) सातारा जिल्ह्यातील कोयना जलाशय – मौजे मुनावळे येथील जलक्रीडा पर्यटन सुविधा (ता.जावळी, जि.सातारा) साठी ४७ कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीस मान्यता देण्यात आली.

५) अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी ऋणमोचन येथील १८ कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. ६) श्री क्षेत्र गहिनीनाथगड (जि. बीड) च्या विकास आराखड्यातील २ कोटी ६७ लाखांच्या कामांस मान्यता देण्यात आली.

७) मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाब या सशस्त्र दहशतवाद्यास जीवंत पकडणाऱ्या शहीद तुकाराम ओंबळे यांच्या सातारा जिल्ह्यातील केंडबे (ता. जावळी) येथील मुळगांवी स्मारक उभारण्यासाठी १५ कोटी रुपयांच्या तरतुदीसाठी मान्यता देण्यात आली.८) नागपूर येथील लक्ष्मीनारायण शिवमंदिर – नंदनवन च्या २४ कोटी ७३ लाखांच्या विकास आराखड्यास मंजुरी दिली.

९) कुत्तेवालेबाबा मंदिर आश्रम – शांतीनगर साठी १३ कोटी ३५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. १०) मुरलीधर मंदिर पारडी विकास आराखड्यासाठी १४ कोटी ३९ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता देण्यात आली.या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार समाधान अवताडे, आमदार श्रीमती सरोज अहिरे, राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, पर्यटन विभागाच्या सचिव श्रीमती जयश्री भोज, सोलापुरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी उपस्थित होते. तसेच जळगांव, नाशिक आणि सातारा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीस उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे