समता गणेश मंडळांने साकारली राजुरी गावच्या वेशीची हुबेहूब प्रतिकृती

1 min read

राजुरी दि.१७:- येथील समता गणेश मंडळाने यावर्षी राजुरी (ता.जुन्नर) गावच्या वेशीची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. दरवर्षी वैविध्यपूर्ण कला व छटा असणाऱ्या देखाव्याचे सादरीकरण करून विघ्नहर्त्या गणरायाची मनोभावे सेवा करण्याचा प्रयत्न या मंडळाच्या मार्फत होत असतो.

समता गणेश मंडळ राजुरी इंदिरानगर या गणेश मंडळाने या वर्षी ३३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. सन १९९२ साली सर्वांनी एकत्र येऊन समता गणेश मंडळाची स्थापना केली. नावाप्रमाणेच समतेचा संदेश देणाऱ्या या मंडळामध्ये सर्वच जाती, धर्माचे, पंथाचे लोक. त्याचप्रमाणे बाराबलुतेदार एकत्रितपणे दरवर्षी श्री गणेशाची मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने पूजा अर्चा करतात. दरवर्षी सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, नैसर्गिक, राजकीय, उपदेशपर, लोककलेवर आधारित, पारंपरिक, लोकजागृतीपर विषयावर आधारित असे नवनवीन देखावे हे मंडळ साकारण्याचा प्रयत्न करते. यापूर्वीही नेहरू युवा केंद्र पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विघ्नहर्त्या गणरायाचे मनोभावे पूजन करताना सामाजिक जाणिवांचे भान बाळगणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आयोजित. स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल सपट चहा व दैनिक गावकरी या वृत्तसमूहाने समता गणेश मंडळ राजुरी यांना विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविले होते. मंडळाची स्थापना झाली तेव्हा १९९२ च्या काळात गणेशाची मूर्ती ही एक पोत्याच्या शेडमध्येच बसविली जात होती. सन २०११ मध्ये पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी, सरपंच माऊली शेळके, उपसरपंच एम डी घंगाळे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत सभापती जयंत रघतवान यांच्या निधीतून मंडळासाठी समाजमंदिर बांधण्यात आले. त्यासाठी भगवान औटी यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. स्थापनेपासून ते आजपर्यंत गरुड, डायनासोर, नारळ गडवा, हनुमान, पर्णकुटी, ससा, मिनी जहाज, बदक, डोंगर, मोर, शेषनाग अशा अनेक कलाकृतींना युक्त असे देखावे सादर केलेले आहेत. सन १९९८ मध्ये मंडळ नोंदणीकृत करण्यात आले.माजी सभापती दीपक औटी यांच्या प्रयत्नातून भजनी साहित्य, सतरंज्या व स्पीकर सेट यांचे वितरण करण्यात आले होते. तसेच या पूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल वल्लभ शेळके यांच्या प्रयत्नातून मंडळाला पारंपरिक वाद्य ढोल व ताशांचे वितरण करण्यात आलेले होते. मागील वर्षी मा.आमदार शरद सोनवणे यांचा दातृत्वातून स्वखर्चाने गणपतीचे शेड उभारण्यासाठी २.५ लक्ष रु.चा निधी मंजूर होऊन काम पूर्ण देखील झालेले आहे. दरवर्षी येथील भाविक या गणेशाला इप्सित कार्य पार पडण्यासाठी नवस करतात व हा गणेश नवसाला पावतो. मनात भाव शुद्ध असेल तर गणपती शुभ फळ देतो अशी याची ख्याती आहे.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुमधुर असा भजनाचा कार्यक्रम त्याचबरोबर रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, दांडिया, चमचा लिंबू इ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहेत. मंडळाच्या या यशस्वी वाटचालीत अध्यक्ष सखाराम गाडेकर, उपाध्यक्ष सिताराम जेडगुले, सचिव भगवान औटी, खजिनदार दिनेश बनकर, सुखदेव पवार आणि तरुण वर्गाचा सक्रिय सहभाग व मोलाचा वाटा आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे