बांगरवाडी पतसंस्थेकडून सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर

1 min read

बेल्हे दि.१५:- बेल्हे (ता.जुन्नर) बांगरवाडी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रानदेवी मंदिराच्या प्रांगणात नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंत कदम यांनी संस्थेला आर्थिक वर्षात १ लाख ५१ हजार ७०९ रुपये नफा झाला असून सभासदांना १०% लाभांश देण्याचा निर्णय जाहीर केला.

२००१ साली स्थापन झालेल्या आपल्या पतसंस्थेचा कारभार अतिशय पारदर्शक असून कर्मचारी वर्गही मेहनतीने व सस्मित मुद्रेने सेवा करत आहे. गेल्या तीन वर्षापासून आपल्याला ऑडिट ‘ ब ‘ वर्ग मिळत असून संस्थेचे भागभांडवल साधारणपणे ११ कोटी ४० लक्ष रुपये,

ठेवी ९ कोटी ३६ लक्ष रुपये, कर्जवाटप ८ कोटी ३९ लक्ष रुपये, गुंतवणूक २ कोटी ३१ लक्ष रुपये, एवढे असून संस्थेची सभासद संख्या ६०२ एवढी आहे. या सर्वसाधारण समेत संस्थेने घेतलेले धोरणात्मक निर्णय व संस्थेने केलेल्या कामाचा आढावा तसेच

संस्थेच्या प्रगतीचा चढता आलेख संस्थेचे व्यवस्थापक प्रमोद बांगर यांनी सभासदांसमोर ठेवला. तसेच संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांना इयत्ता पाचवी ते पदवीपर्यंत शिकणाऱ्या च ७५% पेक्षा अधिक मार्क मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेच्या वार्षिक मीटिंगमध्ये करण्यात आला.

यावेळी सभासदांच्या वतीने हभप बाळशिराम महाराज बांगर व मोहन बाळशिराम बांगर यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी संस्थेचे सर्व संचालक, सभासद बहुसंख्येने उपस्थित होते, आलेल्या सर्व सभासदांचे व मान्यवरांचे आभार संचालक रमेश कसबे यांनी मानले.

यावेळी अध्यक्ष वसंत कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सहकार खात्याचे बदलते नियम, आर्थिक चढउतार याचा पतसंस्थेच्या व्यवहारावर कोणताही परिणाम झाला नसून गेली तेवीस वर्षे आपल्या सर्वांच्या सहकार्याने व सहकार कायद्याच्या चौकटीत राहून व सहकाराची ज्योत तेवत ठेवण्याच्या भावनेतून संचालक मंडळाने यशस्वीपणे काम केले आहे.

हे कामकाज करत असताना सर्व संचालक मंडळ, सेवक वर्ग, सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक यांचे अमूल्य सहकार्य मिळाले आहे, तसेच संचालक मंडळावर सर्वांनी दाखविलेला विश्वासच याला कारणीभूत असल्याचे सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे