निमगाव सावात विद्युत मोटार, स्टार्टर, केबल चोरीने शेतकरी हैराण; लाखो रुपयांचे साहित्य चोरी
1 min read
निमगाव सावा दि.११:- निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील दोन दिवसात अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत मोटार, केबल, फ्युज, स्टार्टर चोरी गेल्या असून सव्वा ते दीड लाख रुपयांच्या विजेच्या साहित्याची चोरी झाली आहे.
सविस्तर माहिती असे की, निमगाव सावा येथील अजित गाडगे यांच्या कळमजाई वस्ती येथील साडेसात एचपी ची विहिरीतील मोटार, केबल, स्टार्टर, चोरी गेले असून त्यामध्ये त्याचे २५ ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अशी लेखी तक्रार शेतकऱ्यांनी नारायणगाव पोलीस स्थानकात दिली आहे. तसेच गावातील खराडीमळा, मीरावाडी वस्ती, पाचपडाळ परिसरातील कुकडी नदी किनारी असणाऱ्या दाऊद इस्माईल पटेल, नजीरा अहेमद पटेल, झाकीर रहमान पटेल, सलीम रसूल पटेल,नाशिर गुलाब पटेल, बशीर वजीर पटेल, नाशिर गुलाब पटेल, मिठू रसूल पटेल या शेतकऱ्यांच्या मोटारी, वायर, केबल तसेच स्टार्टर चोरी गेल्या आहे.
याआधी २० ते २५ दिवसांपूर्वी गावांमध्ये अशाच शेतकऱ्यांच्या मोटर केबल चोरी गेल्या होत्या. तर पाच ते सहा महिन्यांपूर्वी सुद्धा अशा पद्धतीने चोरी झाली यामधे लाखो रुपयांचे साहित्य चोरी गेले.
चोरींची संख्या या भागांमध्ये वाढत असल्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाले असून पोलिसांनी तात्काळ या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.