डिसेंट फाउंडेशनने बेल्ह्यातील किशोरवयीन मुलींना दिले मानसिक व शारीरिक आरोग्याचे धडे

1 min read

बेल्हे दि.११:- मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज बेल्हे (ता.जुन्नर) येथील किशोरवयीन मुलींसाठी डिसेंट फाउंडेशन पुणे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून किशोरवयीन मुली वैयक्तिक स्वच्छता, स्व-संरक्षण व जनजागृती अभियानांतर्गत “कळी उमलताना” हा कार्यक्रम घेण्यात आला.

मुलींनी मासिक पाळी बाबत काही शंका किंवा प्रश्न असल्यास आपल्या आईशी, शिक्षिकेशी किंवा डॉक्टरांशी मनमोकळेपणाने बोलले पाहिजे. या वयात शरीरात होणाऱ्या बदलांविषयी जाणून घेतले पाहिजे. तसेच जर काही त्रास होत असेल तर त्याविषयी निसंकोच पणे बोलले पाहिजे. मासिक पाळी हे एक नैसर्गिक घटना चक्र आहे त्याला अपवित्र मानू नये. असे आवाहन यावेळी डॉ.पुष्पलता शिंदे यांनी मुलींना मार्गदर्शन करताना केले. यावेळी मासिक पाळीच्या काळात स्वच्छता कशी राखावी, पर्यावरण पूरक सॅनिटरी पॅड चा वापर कसा करावा व त्याची विल्हेवाट कशी लावावी. या काळात आहार कसा असावा, व्यायाम कसा करावा याबाबतही त्यांनी मुलींना मार्गदर्शन केले.तसेच प्रकाश चौधरी यांनी मुलींना मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करत असताना, मोबाईलचा योग्य वापर करा. आई-वडील आपले दैवत आहेत, त्यांच्याशी संवाद ठेवा आणि चांगली संगत करा असे आवाहन मुलींना केले.डिसेंट फाउंडेशनने संपूर्ण पुणे जिल्ह्यातील पंचवीस हजार किशोरवयीन मुलींपर्यंत हा उपक्रम पोहोचवला असून, त्यांना मोफत पर्यावरण पूरक सॅनिटरी पॅड व “कळी उमलताना” या मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप केले आहे.याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, प्रमुख मार्गदर्शिका डॉ.पुष्पलता शिंदे, हेमलता शिंदे, प्रकाश चौधरी, कविता भोर, समन्वयक योगेश वाघचौरे, तसेच संस्थेचे विश्वस्त दावला कणसे,प्राचार्या विद्या गाडगे,उपप्राचार्य के.पी सिंग,माता पालक,बेल्हे गावातील महिला व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थिनींना मोफत कळी उमलताना या मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर पटाडे यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका विद्या गाडगे यांनी मानले. संस्थेचे संस्थापक सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे.विश्वस्त दावला कणसे व संचालक मंडळ यांनी डिसेंट फाउंडेशनचे आभार मानले.चौकट :- मुलींनो गुड टच बॅड टच ओळखा, हेमलता शिंदे स्पर्शज्ञान ही स्त्री ला मिळालेली एक देणगीच आहे. समोरची व्यक्ती आपल्याला कोणत्या हेतूने स्पर्श करते हे तिच्या लगेच लक्षात येते. परंतु लहान लहान मुलींना ते ज्ञान अवगत नसते. म्हणूनच कुटुंबात, शाळेत अथवा समाजात वावरत असताना सांभाळून रहा. एखादी व्यक्ती आपल्याशी कोणत्या हेतूने सलगी करते हेही लक्षात घ्या. आणि तसे काही वाटल्यास आपल्या आई वडिलांना सांगा. असा मोलाचा सल्ला यावेळी हेमलता शिंदे यांनी मुलींना दिला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे