जुन्नर ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणी वर्धन करण्यास मान्यता:- आमदार अतुल बेनके
1 min read
जुन्नर दि.११:- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जुन्नर येथील ३० खाटांच्या रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता शासनाने मान्यता दिल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.
अधिक माहिती देताना आमदार अतुल बेनके यांनी सांगितले की नारायणगाव ग्रामीण रुग्णालयानंतर जुन्नर ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणी वर्धन करण्याबाबतची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विशेष बाब म्हणून केली होती. त्यानुसार जुन्नर येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्याचा प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तालयाने सादर केला होता. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. या प्रस्तावाला मान्यता विशेष बाब म्हणून मान्यता मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या निर्णयामुळे जुन्नर शहर आणि परिसरातील नागरिकांना आणखी चांगल्या दर्जाच्या आणि अत्याधुनिक आरोग्य सोयी सुविधा मिळतील आणि तालुक्यातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट होण्यास मदत होणार आहे असा विश्वास आमदार बेनके यांनी व्यक्त केला आहे.