व्ही.जे.इंटरनॅशनल स्कूल मध्ये दहीहंडी उत्सव जल्लोषात संपन्न
1 min read
नगदवाडी दि.२७:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही.जे. इंटरनॅशनल स्कूल नगदवाडी (ता.जुन्नर) मध्ये नर्सरी ते दहावी पर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांनी दहीहंडी उत्सवाचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार कमी-अधिक उंचीच्या दहीहंडी छान सजवून बांधण्यात आल्या होत्या. छान सजावट, नटलेले बालकृष्ण, राधा, सखे – सोबती आणि सर्व गोविंदा यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय आणि जल्लोष पूर्ण झाले होते. सर्वप्रथम लहान मुलांची दहीहंडी फोडून त्यानंतर प्राथमिक व माध्यमिक विभागातील गोविंदांनी थर रचून सर्व मुलांच्या व शिक्षकांच्या उपस्थितीत दहीहंडी फोडली.
यानंतर सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. शाळेच्या शिक्षिका पुनम राऊत यांनी ‘ दहिहंडी – गोपाळकाला’ याविषयी विद्यार्थ्यांना छान माहिती सांगितली. जन्माष्टमी हा सण श्रीकृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो. श्रीकृष्णाच्या जन्माच्या अनेक लीला आहेत त्यात दहीहंडी ही देखील त्याची एक लीला आहे.
या उत्सवाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येऊन एकोपा वाढवा हा उद्देश विद्यार्थ्याना त्यांनी स्पष्ट केला. या उत्सवासाठी विनायक वऱ्हाडी, पराग छिल्लारे, अमोल जाधव व रोशन बनकर या शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले.
तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. समन्वयिका सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने दहीहंडी उत्सव संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे तसेच सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.