निलंबित पोलीसच निघाला सराईत चोरटा

पुणे दि.२५: पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील उंबरवाडा बालगुडेवस्ती येथील महिलेचे मंगळसूत्र चोरीप्रकरणी दोन आरोपींना अटक केली. यामध्ये निलंबित पोलीसच सराईत चोरटा निघाला. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोघांना अटक केली असून अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

विनोद मारुती नामदास (रा. वाणेवाडी, ता. बारामती) हा निलंबित पोलीस असून रोहित विनायक जाधव हा त्याचा साथीदार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरगावनजीक मोडवे हद्दीत सन २०२२ मध्ये जबरी चोरी,वडगाव निंबाळकर हद्दीतील विद्युप पंपासह दुचाकी चोरी केल्याप्रकरणी दोघांना अटक केली होती. या घटनेमध्ये विनोद नामदास याचा समावेश असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतरही त्याने मुरूम येथील रोहित जाधव याच्या साथीने चोरीचा उद्योग चालू ठेवला होता. गुरुवारी (दि. २२, ऑगस्ट) उंबरवाडा बालगुडेवस्ती येथून संजना कांतिलाल शिंदे यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला. या वेळी शिंदे यांनी प्रतिकार केला असता त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि तेथून पळून गेले. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपास करून विनोद नामदास व रोहित जाधव या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून जबरी चोरी व इलेक्ट्रिक मोटार चोरीचे तीन गुन्हे उघड झाले आहेत. ही कारवाई वडगाव निंबाळकरचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, पांडुरंग कन्हेरे, रमेश नागटिळक, महेश पन्हाळे, भाऊसो व मारकड व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे