गुरुवर्य ए.गो.देव प्रशालेत विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप
1 min read
बोरी दि.२२:- बोरी खुर्द (ता.जुन्नर) येथील गुरुवर्य ए.गो.देव प्रशालेत विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले अशी माहिती प्रशालेचे मुख्याध्यापक शमशुद्दीन पटेल यांनी दिली.प्रशालेत शिकत असणारे काही विद्यार्थी हे २ कि.मी.पेक्षा जास्त अंतरावरून दररोज पायी शाळेत येतात. ऊन व पाऊस असल्यास ते नियमित शाळेत येऊ शकत नाहीत. तसेच परिसरात बिबट्यांची दहशत आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडतो. ही समस्या ओळखून शाळेच्या मार्च १९९९ च्या इयत्ता १० वी बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत अशा गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना स्वखर्चाने सायकली भेट देण्याचे ठरवले.
याकामी प्रशालेचे शिक्षक विजय चव्हाण यांनी विशेष पुढाकार घेऊन हा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून दिला. प्रशालेचे माजी विद्यार्थी प्रा.संजय जाधव,दिनेश चिंचवडे,मनोज जांभळे,अशोक बांगर, डॉ.संतोष काळे,नंदकुमार चिंचवडे,स्वाती वायकर,साधना उंडे,नीलम घोलप,शीतल शेटे यांनी एकत्र येत प्रशालेतील विशाल शिंदे,सुमित पवार.
निशा शिंदे या विद्यार्थ्यांना तीन नवीन सायकली भेट दिल्या.त्यामुळे त्यांची शाळेत येण्या जाण्याची सोय झाली.त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमप्रसंगी सर्वोन्नती मंडळाचे अध्यक्ष विक्रम शिंदे,उपाध्यक्ष लक्ष्मण काळे,सचिव नरहरी शिंदे, माजी विद्यार्थी प्रा.संजय जाधव,नंदकुमार चिंचवडे,रवींद्र बांगर व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विक्रम शिंदे व प्रा.संजय जाधव यांनी मनोगते व्यक्त केली.विद्यार्थ्यांना व शाळेला लागणारी सर्वोतोपरी मदत यापुढेही पुरवली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. संस्थेच्या वतीने माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेचे शिक्षक अमित शेटे,हर्षदा जाधव व रवींद्र जाधव यांनी केले.सूत्रसंचलन संजय धायबर यांनी केले तर विजय चव्हाण यांनी आभार मानले.