भर दिवसा व्यापाऱ्याचा बंगला फोडला; ३२ तोळे सोने व १ लाख रोकड लंपास घरफोड,
1 min read
नारायणगाव दि.२१:- जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अभय दयानंद पाटे यांच्या बंद बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सुमारे बत्तीस तोळे सोन्याचे दागिने व एक लाख रुपयांची रोख रक्कम, असा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन तरुण चोरी करताना आढळून आले आहेत, अशी माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.या बाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवारी (दि.१९) दुपारी दीड वाजता ही घटना घडली.
अभय पाटे यांचा येथील रस्त्यालगत बंगला आहे. नारायणगाव येथे त्यांचे किराणा मालाचे दुकान आहे. रक्षाबंधन सण असल्याने कुटुंबातील महिला बाहेरगावी गेल्या होत्या, तर घरातील पुरुष मंडळी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बंगल्याला कुलूप लावून किराणा मालाच्या दुकानात गेले होते.
दुपारी दीडच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी बंगल्याच्या कंपाउंडवरून उडी मारून आवारात प्रवेश केला. दरवाजाचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला. बंगल्यात घुसल्यावर खोडद त्यांनी कपाटाचे लॉकर तोडून सुमारे बत्तीस तोळे सोन्याचे दागिने व एक लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन ते पसार झाले.
चोरट्यांनी अवघ्या वीस मिनिटांत चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. सायंकाळी अभय पाटे यांचे कुटुंबीय घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती नारायणगाव पोलिस ठाण्यात दिली.
मंगळवारी (दि. २०) सकाळी घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला. नागपंचमीचा सण असल्यामुळे कुटुंबातील महिलांनी दागिने घरी आणून ठेवले होते. सण झाल्यावर ते पुन्हा सुरक्षित ठिकाणी ठेवणार होते.
मधल्या काळातच या दागिन्यांवर डल्ला मारला भेला. बहुधा घर बंद आहे तसेच कुटुंबातील काही सदस्य पुण्याला, तर काही एका कार्यक्रमाला गेले आहेत. दिवसभर कुणी घरी येणार नाही, याबाबतची माहिती या चोरट्यांना असावी किंवा कोणीतरी पाळत ठेवून ही चोरी केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.