श्री बेल्हेश्वर विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांकडून सीमेवरील सैनिकांना राख्या
1 min read
बेल्हे दि.२१:- रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून सीमेवरील सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यालयातील विद्यार्थिनींनी भारतीय सैन्य दलातील सैनिकांना राख्या पाठवल्या आहेत. या उपक्रमाचे हे सलग तिसरे वर्ष असून सैन्यदलाकडून पत्राद्वारे विद्यार्थीनींचे आभार व्यक्त करण्यात आल्याने त्यांचा उत्साह दुणावला आहे. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेचे आजीव सेवक अजित अभंग यांनी दिली. भारतीय सैनिक अहोरात्र सीमेचे रक्षण करत असतात. सैनिकांमुळेच आपण सर्वजण सुरक्षित आहोत. सैनिकांच्या बंधूभावापोटी श्री बेल्हेश्वर विद्यामंदिरातील विद्यार्थीनींनी स्वतः राख्या तयार केल्या.
प्लँस्टिकमुक्त, पर्यावरणपूरक राख्या तयार करण्याला विद्यार्थिनींनी प्राधान्य दिले. टाकाऊपासून टिकाऊ या तत्वाचाही राख्या बनवताना विचार केला. विद्यार्थीनींनी स्वतःच्या कल्पकतेतून ३८० वैविध्यपूर्ण राख्या तयार केल्या व पोस्टाद्वारे भारतीय सैनिकांना पाठवल्या.
विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागप्रमुख कोमल कोल्हे व माता पालक संघाच्या सचिव अश्विनी गेंगजे यांनी राख्या बनवण्यासाठी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. स्मिता बांगर व जयश्री फापाळे यांनी राख्यांचे संकलन केले.