सह्याद्री व्हॅलीत भरली विठ्ठल नामाची शाळा
1 min readराजुरी दि.१९:- सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूलच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडी सोहळ्यात पूर्व प्राथमिक विभाग ते इयत्ता दहावी पर्यंतचे विद्यार्थी वारकरी वेशभूषेत सहभागी होऊन विठ्ठल भजनात तल्लीन झाले होते. विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी,आपल्या संस्कृतीचे पुढच्या पिढीत जतन व्हावे म्हणून दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता १ ली व पूर्व प्राथमिक विभागातील छोटे विद्यार्थी संतांच्या व विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत आले होते. दिंडीतील विविध संतांच्या व विठोबा रखुमाई यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांना पाहून प्रत्यक्ष पंढरपूरचे दर्शन उपस्थितांना घडले. यावेळी पालखीचे पूजन होस्टेलचे व्यवस्थापक देविदास हांडे, उपमुख्याध्यापिका रिजवाना शेख, यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय भालेराव हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सचिन डेरे यांनी केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी रिंगण घातले व विद्यार्थिनींनी रिंगणात फुगड्या घातल्या. यावेळी अनेक आध्यात्मिक नृत्य व भारुड विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यानी बांगरवाडी येथील गुप्त विठोबा येथे तीर्थक्षेत्र भेट दिली. इयत्ता नववीत शिकणाऱ्या सिद्धी जाधव हिने विठ्ठल मंदिरात कीर्तन सेवा सादर केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्वच शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली होती.
या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.यावेळी विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून चिक्की व राजगिरा लाडू याचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सीमा पाडेकर यांनी केले व उपस्थितांचे आभार अनुजा देशमुख यांनी मानले.