समर्थ गुरुकुल मध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात बालदिंडी सोहळा संपन्न

1 min read

बेल्हे दि.१७:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल, बेल्हे (बांगरवाडी) या सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त पायी बालदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.दिंडीचे पूजन संस्थेच्या संचालिका सारिका शेळके व माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बालचमुन्नी साकार केलेल्या या बालदिंडी सोहळ्यासाठी संकुलातील सर्व विभागाचे प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर, मुक्ताई, सोपानदेव, निवृत्तीनाथ,संत तुकाराम, संत एकनाथ,संत नामदेव या सर्व संतांची मांदियाळीच जणू समर्थ संकुलात एकत्रित सर्वांना पाहायला मिळाली. कमरेवरती हात ठेवून विठुरायाचे ते सावळे, सुंदर, मनोहर आणि साजिरे स्वरूप त्याचबरोबर रुक्मिणी मातेचे ते अलौकिक रूप पाहून साक्षात पंढरी संकुलामध्ये अवतरल्याचा भास सर्वांना होत होता.समर्थ गुरुकुल पासून प्रस्थान करण्यात आलेल्या या दिंडीचे संकुलातील इंजिनीअरिंग, फार्मसी, लॉ कॉलेज, हॉस्पिटल, नर्सिंग कॉलेज, होस्टेल, आयटीआय,समर्थ पॉलिटेक्निक, एमबीए, बीसीएस, ज्युनिअर कॉलेज या सर्वच महाविद्यालयातील प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या प्रवेशद्वाराजवळ दिंडीचे स्वागत व पूजन केले. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची भगवी पताका हातात घेऊन डोक्यावर तुळस आणि टाळ मृदुंगाच्या ठेक्यात विठू नामाच्या गजराने सर्व परिसर दुमदुमून सोडला.विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, माऊली-माऊली, पंढरी पंढरी-अशी विठुरायाची पंढरी, येई वो विठ्ठले न माझे माऊली ये. माझी पंढरीची माय या गाण्यांवर गुरुकुल च्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम नृत्य सादरीकरण केले.विठ्ठल-रूखमाई सोबतचे सर्व संतांचे दर्शन, रिंगण, फुगडी, पावली, लेझीम अशा प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण व वैविध्यपूर्ण पारंपरिक खेळांनी बालचुमुंनी सर्वांची मने वेधून घेतली.ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून बालमनावर केले जाणारे संस्कार भारताचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके यांनी सांगितले.बांगरवाडी चे माजी सरपंच जालिंदर बांगर, मनाजी गटकळ सर यांनी आपले मनोगत व्यक्त करत गुरुकुल च्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, मीरा शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके. सारिका शेळके, अनंत गटकळ, डीबी गटकळ,बबन गटकळ,यशवंत औटी,गणेश हाडवळे,बांगरवाडी चे माजी सरपंच जालिंदर बांगर,आदि मान्यवर उपस्थित होते.सदर बालदिंडीचे नियोजन प्राचार्य सतिश कुऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे