शिक्षण विस्तार अधिकाऱ्यास कोंडून मारहाण करणाऱ्या दोन शिक्षकांचे निलंबन; शिरूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार

1 min read

शिरूर दि.४: – शाळा भेटीसाठी गेलेल्या शिक्षणविस्तार अधिकाऱ्यांना दोघा शिक्षकांनी, मुख्याध्यापक कक्षात कोंडले. पायावर पाय ठेवून बळजबरीने खुर्चीत बसवून त्यांचा मोबाइल हिसकावून घेत त्यांना जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण केली. यानंतर त्यांना शाळेबाहेर हाकलून दिले. दरम्यान, गटविकास अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत तात्काळ शिक्षक महेश आनंदराव काळे व कैलास फक्कड पाचर्णे यांचे निलंबन केले आहे.पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव सांडस केंद्रातील दत्तनगर जिल्हा परिषद शाळेत २८ जून रोजी हा प्रकार घडला. विस्तार अधिकारी (शिक्षण) रघुनाथ बजाबा पवार यांनी दिलेल्या अहवालावरून तसेच त्यांच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड झालेल्या संभाषण व चित्रफितीच्या आधारे काळे व पाचर्णे यांच्यावर गटविकास अधिकारी महेश डोके यांनी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे.

शिक्षक संघटनांच्या दबावामुळे प्रशासनाने; तर बदनामी टाळण्यासाठी शिक्षकांमधून कमालीचे मौन बाळगले जात आहे. विस्तार अधिकारी पवार यांनी पंचायत समितीला सादर केलेल्या अहवालानुसार ते शुक्रवारी रांजणगाव सांडस केंद्रातील दत्तनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भेट व तपासणीसाठी गेले होते. त्यांनी शाळेत प्रवेश करताच महेश काळे व कैलास पाचर्णे या शिक्षकांनी त्यांना दमदाटी, शिवीगाळ केली. भेदरलेल्या पवार यांनी पंचायत समितीकडे लेखी अहवाल सादर केला आहे. मोबाइलमधील संभाषण चित्रफीतदेखील सादर केली आहे. गटविकास अधिकारी डोके यांनी गंभीर दखल घेत काळे व पाचर्णे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असताना आणि शाळा सुरू झालेल्या शाळांना भेटी देऊन पाहणी करण्याच्या सूचना शिक्षणाधिका-यांनी केल्या आहेत.

प्रतिक्रिया

“विस्तार अधिकारी (शिक्षण) रघुनाथ पवार हे प्रथमच दत्तनगर येथे शाळा भेटीसाठी गेले होते. त्यांची पार्श्वभूमी त्रास देण्याची नाही. तरीही हा प्रकार घडल्याने त्याची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित शिक्षकांची व्हिडिओतील वाक्ये देखील आक्षेपार्ह असल्याने संबंधित शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.”

– महेश डोके, गटविकास अधिकारी

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे