मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे १८ हजार रुपये मिळण्यासाठी असा करा अर्ज
1 min read
मुंबई दि.१:- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच अर्थसंकल्प जाहीर केला.
त्यावेळी अजित पवार यांनी अनेक घोषणा केल्या. त्यामध्ये माझी लाडकी बहीण ही योजना देखील आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून महिलांना महिन्याला दीड हजार रुपये व वर्षाला १८ हजार रुपये मिळणार आहेत.
योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
या योजनेचा लाभ २१ ते ६० वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत आणि निराधार महिलांना मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
योजनेची पात्रता :
– महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असावी.
– विवाहित, विधवा, घटस्फोटीत किंवा निराधार असावी.
– वय 21 ते 60 वर्षे असावे.
– बँक खाते असणे गरजेचे आहे.
– कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे :
– आधार कार्ड
– महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला
– कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला
– बँक खाते, पासबुकाच्या पहिल्या पानाची प्रत
– पासपोर्ट आकाराचा फोटो
– रेशन कार्ड
– योजनेच्या अटी आणि शर्तींचे पालन करण्याचे हमीपत्र
अर्ज कसा करायचा?
पात्र असलेल्या महिला या योजनेचा अर्ज पोर्टल, मोबाईल ॲप, सेतू सुविधा केंद्रावर जाऊन करू शकतात. ऑनलाईन अर्ज करता येत नसल्यास अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प, ग्रामपंचायत वार्ड इत्यादी ठिकाणी अर्ज करता येईल.
या योजनेमुळे महिलांना आर्थिक मदत मिळून त्यांच्या जीवनात सुधारणा होण्यास मदत होईल. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना एक महत्वपूर्ण पाऊल ठरेल. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.