भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल आनंद भंडारी यांचा श्री बेल्हेश्वर विद्यामंदिरात सत्कार समारंभ
1 min read
बेल्हे दि.२८:- रयत शिक्षण संस्थेचे श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर व कै. हरिभाऊशेठ गुंजाळ उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी व बेल्हे गावचे सुपुत्र अतिरिक्त आयुक्त (जमाबंदी) यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल श्री बेल्हेश्वर विद्यामंदिरामार्फत त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. शाळा समितीचे सदस्य विश्वनाथ डावखर हे सत्कार सन्मान सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली कै. लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
विद्यालयाचे माजी विद्यार्थी गणेश चोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकातून त्यांनी आनंद भंडारी यांच्या आजवरच्या प्रशासकीय कारकीर्दीचा आढावा घेतला. विद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ, बुके व स्मृतिचिन्ह देऊन आनंद भंडारी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
आनंद भंडारी यांचा मित्र परिवार व विविध सामाजिक संघटनांच्या वतीनेही आनंद भंडारी यांचा सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना आनंद भंडारी म्हणाले की,” विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा बाऊ न करता आत्मविश्वासाने या परीक्षांना सामोरे जायला हवे. आयुष्यात मिळणाऱ्या संधीचे विद्यार्थ्यांनी सोने करावे.
वाचनाची सवय अंगी बाणवावी” शालेय विद्यार्थ्यांसाठी विद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी निलेश धानापुने यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. विद्यालयाचे प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्था साताराचे आजीव सेवक अजित अभंग यांनी आनंद भंडारी यांचे अभिनंदन करतानाच विद्यार्थ्यांनी आनंद भंडारी यांचा आदर्श घ्यावा. असे सूतोवाच केले. डॉ. स्मिता भंडारी यांनी मुलींना स्वतःच्या कर्तुत्वातून स्वतःची ओळख बनवावी असा सल्ला आपल्या मनोगतातून दिला. विश्वनाथ डावखर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आनंद भंडारी यांची प्रशासकीय सेवेतील निवड ही आपल्या गावच्या दृष्टीने अभिमानाची व गौरवाची बाब आहे, असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी बेल्हे गावच्या लोकनियुक्त सरपंच मनिषा डावखर, उपसरपंच राजेंद्र पिंगट, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र गाडगे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सावकार पिंगट, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सुमित बोरचटे, सेवानिवृत्त रयत सेवक बबन पिंगट, ग्रामपंचायत सदस्य मंदा नायकोडी. पल्लवी भंडारी, सामाजिक कार्यकर्ते जानकू डावखर, राकेश डोळस, बाळासाहेब बांगर, कैलास औटी, संतोष भुजबळ, सरला पिंगट, सविता गुंजाळ, सुनील भळगट, स्वप्निल भंडारी, दत्तात्रय गुंजाळ, संतोष गांधी, प्रमोद गांधी.
मनीषा शिंगवे, प्रीती गांधी, लीना गांधी, मंगेश गुंजाळ तसेच आनंद भंडारी यांचे कुटुंबिय व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन विठ्ठल पांडे यांनी केले. विकास गोसावी यांनी उपस्थितांचे आभार मानले.