कौटुंबिक वादातून गोळीबार; एकजण गंभीर जखमी

1 min read

अहिल्यानगर दि.२७:- कौटुंबिक वादातून गोळीबार झाल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील हत्राळ गावात घडली. माणिक सुखदेव केदार (वय ५५) हे या घटनेत गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेनंतर गोळी झाडणारा सुभाष विष्णू बडे (वय ३०, रा. येळी, पाथर्डी) याला परिसरातील लोकांनी ताब्यात घेऊन चोप दिला व पकडून दोरीने बांधून ठेवले.

त्यानंतर पोलिसांनी आरोपी बडे याला ताब्यात घेतले. यासंदर्भात माहिती अशी की, बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हत्राळ गावातील माणिक केदार जेवण करत असताना, तेथे सुभाष विष्णू बडे आला. त्याने त्याच्याकडील असलेल्या पिस्टलमधून माणिक केदार यांच्यावर गोळी झाडली. ती गोळी केदार यांच्या डाव्या बाजूला बरगडीच्या वरती लागून ते गंभीर जखमी झाले. केदार यांना तातडीने पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर, अमोल आव्हाड, सुहास गायकवाड, संदिप बडे यांच्यासह पोलीस पथक हत्राळ गावात दाखल झाले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आरोपी बडे याला गावातील ग्रामस्थांनी चोप देऊन बांधून ठेवले. यात आरोपी सुभाष बडे जखमी झाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे