तलाठ्याने शेतकऱ्याकडून घेतली १० हजार लाच; तलाठी ACB च्या जाळ्यात
1 min read
पुणे दि.२७:- शेतजमीनीच्या सातबारा उताऱ्यावर असलेली गिनी गवताची नोंद कमी करुन दुरुस्त केलेला उतारा देण्यासाठी शेतकऱ्याकडून १० हजार रुपये लाच घेताना मावळ तालुक्यातील खांडशी गावच्या तलाठ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.२५) कार्ला येथील मंडल कार्यालयाच्या परिसरात करण्यात आली.याप्रकरणी तलाठी अंकुश रामचंद्र साठे याच्याविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करणात आला.
याबाबत एका 39 वर्षीय शेतकऱ्याने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 19 जून रोजी तक्रार दिली होती. सातबारा उताऱ्यात दुरुस्ती करण्यासाठी खांडशी गावचे तलाठी साठे याने शेतकऱ्याला दहा हजारांची लाच मागितली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. त्या
वेळी तलाठी अंकुश साठे याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच लाचेची रक्कम घेऊन कार्ला येथील मंडल कार्यालयात बोलावले. एसीबीच्या पथकाने सापळा लावून शेतकऱ्याकडून लाच घेताना साठेला रंगेहात पकडले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करत आहेत.