शरद बँकेच्या वसुली अधिकाऱ्याने केली सव्वातीन लाख रुपये लाचेची मागणी; गुन्हा दाखल
1 min read
पुणे दि.२५:- कर्ज प्रकरणात जामीनदाराविरुद्ध दाखल झालेली तक्रार मागे घेण्यासाठी शरद सहकारी बँकेच्या शिक्रापूर शाखेतील वसुली अधिकाऱ्याने सव्वातीन लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शरद सहकारी बँकेतील शिक्रापूर शाखेतील वसुली अधिकारी राजाराम मारुती डेरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार यांनी फिर्याद नोंदवली आहे. या प्रकरणातील तक्रारदाराच्या मित्राने २०१३ मध्ये शरद सहकारी बँकेकडून तीन कोटींचे कर्ज घेतले होते. या प्रकरणात तक्रारदार जामीनदार राहिले होते. कर्जाची रक्कम थकल्याने सहकारी संस्थेच्या अपर निबंधकाने वसुली अधिकारी डेरे यांची नियुक्ती केली.
कर्जदार रक्कम भरण्यास अपात्र झाल्याने कर्जदार आणि जामीनदाराविरुद्ध तक्रार, तसेच दावा दाखल केला होता. तक्रारदार जामिनदाराने नैतिक जबाबदारी स्वीकारुन मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल करुन उर्वरित कजार्ची सर्व रक्कम जामीनदार या नात्याने कर्ज खात्यात भरली.
व कर्ज बाकी नसल्याचा बँकेकडून दाखला घेतला. त्यानंतर तक्रारदार यांनी बँकेच्या संचालक मंडळास कर्ज वसुलीच्या दरम्यान दाखल केलेल्या तक्रारी, तसेच दावे मागे घेण्याबाबत विनंती अर्ज केला होता. त्यास शरद सहकारी बँक, शाखा शिक्रापूर यांनी मान्यता दिली आणि याबाबतचा आदेश बँकेने वसुली अधिकारी डेरे यांना दिला.
तक्रारदार व्यक्ती वसुली अधिकारी डेरे यांच्याकडे पाठपुरावा करत होते. मात्र, डेरे यांनी तक्रारदाराविरुद्ध तक्रार घेण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली. तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली. तेव्हा डेरे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.