बोरी खुर्द येथील शाळांमधील विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप

1 min read

बेल्हे दि.१७:- सेवा सहयोग फाउंडेशन ठाणे (मुंबई) या सेवाभावी संस्थेच्या वतीने बोरी खुर्द (ता.जुन्नर) येथील गुरुवर्य ए.गो.देव प्रशाला व जि.प.प्राथमिक शाळा या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल किटचे नुकतेच वाटप करण्यात आले अशी माहिती प्रशालेचे मुख्याध्यापक शमशुद्दिन पटेल व प्राथमिक शाळेचे मुख्याधयापक भाऊसाहेब गवळी यांनी दिली.

सेवा सहयोग फाउंडेशन, ठाणे ही सेवाभावी संस्था शिक्षण क्षेत्रात काम करते. दरवर्षी शाळा सुरू झाली की पालकांची मुलांचे शालेय गणवेश, दफ्तर, पाठ्यपुस्तके, वह्या आणि इतर शैक्षणीक साहित्य खरेदीसाठी खूप आर्थिक ओढाताण होते. पालकांची हीच अडचण ओळखून समाजातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना साहित्य रुपात संस्था मदत करते.बोरी खुर्द येथील गुरुवर्य ए.गो.देव प्रशाला व जि. प.प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना या संस्थेच्या वतीने नुकतेच अतिशय उच्च प्रतीचे स्कूल किटचे वाटप करण्यात आले. या किट मध्ये दफ्तर, वह्यांचा संच, कंपास बॉक्स, आलेख वही, चित्रकला वही व इतर साहित्य देण्यात आले. शाळेचे माजी विद्यार्थी संपत बांगर यांच्या विशेष प्रयत्नातून शाळांसाठी ही मदत मिळवून देण्यात आली.
या किट वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संपत बांगर हे होते. या प्रसंगी सर्वोंनती मंडळाचे अध्यक्ष विक्रम शिंदे, उपाध्यक्ष लक्ष्मण काळे,सचिव नरहरी शिंदे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंगनाथ बांगर,पोलीस पाटील अक्षय काळे,गोरक्ष शेटे,रोहन बेल्हेकर ,दोन्ही शाळांचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.

संपत बांगर यांनी त्यांच्या मनोगतातून संस्थेच्या सामाजिक कार्याबद्दल माहिती दिली.संस्थेच्या वतीने महाराष्ट्रात यावर्षी सहा हजार तर जुन्नर व शिरूर तालुक्यातील अकरा शाळांना ३५८ स्कूल किट वाटप करण्यात आले अशी माहिती त्यांनी दिली.तसेच किट मिळवण्यासाठी संस्थेचे विश्वस्त कासार यांचे विशेष सहकार्य लाभले असे सांगितले. समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांपर्यंत ही मदत पोहचते याचे विशेष समाधान वाटते अशी भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली व संस्थेचे ऋण व्यक्त केले.शाळेच्या पहिल्याच दिवशी स्कूल किट मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. मिळालेल्या या मदतीचा आम्ही नक्कीच उपयोग करून आयुष्यात मोठे होऊन असेच काम करू असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास मटाले यांनी तर आभार शमशुद्दीन पटेल यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे