आजारी विवाहितेला बसमधून उतरण्यासाठी १०० रुपयांची मागणी

1 min read

पाथर्डी दि.९:-बीड ते पुणे प्रवास करणाऱ्या एका विवाहितेला रक्तदाबाचा त्रास झाल्याने तिने बस थांबवण्याची विनंती केली, मात्र वाहकाने १०० रुपयांची मागणी केली. ते न दिल्यास बस थांबणार नसल्याचे सांगितल्याचे समजते. बुधवारी (ता. ४) करंजी घाटात घडलेल्या या धक्कादायक घटनेने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.पाथर्डी शहरातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील ही महिला आपल्या दोन लहान मुलांसह बुधवारी (ता. ४) सकाळी ११ वाजता पाथर्डी बसस्थानकातून बीड-पुणे या एसटी बसमध्ये स्वार झाली. तिने पाथर्डी ते पुणे असा प्रवास तिकीटही काढले. मात्र, तिसगावजवळ तिला अचानक रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला आणि चक्कर येऊ लागली. तिने वाहकाला तातडीने बस थांबवण्यास सांगितले. मात्र, वाहकाने तिकीट असूनही १०० रुपये देण्याची मागणी केली. आणि बस थांबवण्यास नकार दिला.महिलेने हा प्रकार तिच्या पतीला फोनद्वारे कळवला. पतीने तातडीने स्वतःचे वाहन काढून बसचा पाठलाग सुरू केला. अखेर करंजी घाट संपल्यानंतर महिलेने नाईलाजाने वाहकाला १०० रुपये दिले. त्यानंतरच वाहकाने बस थांबवली आणि तिला तिच्या दोन मुलांसह खाली उतरवले. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे