गेल्या १५ दिवसांत दिसेल तिथे बिबट्या पकडण्याचे आदेशानंतर २६ बिबटे जेरबंद; नगदवाडी आणि पिंपरखेड येथे बेस कॅम्प 

1 min read

पुणे दि.१६:- जुन्नर तालुका आणि उत्तर पुणे जिल्ह्यातील मानव बिबट संघर्ष उपाययोजना सुचविण्यासाठी गठीत समितीची बैठक मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक पुणे यांच्या कार्यालयात नुकतीच संपन्न झाली.

यावेळी जुन्नर तालुक्यातील बिबट हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. या बैठकीतील मुद्दे खालील प्रमाणे:- बिबटे पकडण्यासाठी पिंजाऱ्यांची संख्या वाढवण्या संदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी येत्या १ ते दीड महिन्यात पूर्ण होईल.

सध्या १५० पिंजरे उपलब्ध आहेत हि संख्या आता ३०० पिंजरे इतकी होणार आहे. हे पिंजरे बनवण्याचे काम देखील सध्या सुरू आहे. बिबटे पकडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्स साठी नगदवाडी आणि पिंपरखेड येथे बेस कॅम्प तयार करण्यात आलेला आहे.

यामध्ये गेल्या १५ दिवसांत दिसेल तिथे बिबट्या पकडण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत देण्यात आल्यानंतर आत्ता पर्यंत २५ ते २६ बिबटे पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. यातील १० बिबटे गुजरात मधील जामनगर याठिकाणी पाठविण्यात येणार आहेत. आणि राहिलेले बिबटे इतर ठिकाणी पाठवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर सध्या चर्चा सुरू आहे.

तसेच माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्राचे विस्तारीकरण करून या केंद्रातील बिबट्यांची संख्या वाढवून ती ११० इतकी करण्यात येणार आहे. येत्या ३ महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच नसबंदी संदर्भातील प्रस्तावातील त्रुटींवर काम करून तो प्रस्ताव पुन्हा PCCF कडे पाठवण्यात आलेला आहे.

लवकरच हा प्रस्ताव आता केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वन विभागासाठी नवीन ७ गाड्या देण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे बेस कॅम्प साठी नेट, काठ्या, टॉर्च बॅटरी, ट्रँकुलायझिंग गन, ड्रोन कॅमेरे यासारखे आवश्यक साहित्य पुरविण्यात येणार आहे. तसेच धनगरांच्या वाड्यांसाठी तंबू, टॉर्च बॅटरी पुरविण्यात येणार आहे.

सध्या प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना राबविण्यासाठी प्रयत्नशील असताना गेल्या १५ दिवसांत दिसेल तिथे बिबट्या जेरबंद करण्याचे आदेश दिल्यानंतर वन विभागाने चांगले काम केले आहे. जुन्नर तालुक्यातील जनतेने सतर्क राहावे बिबट्या दिसल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन यानिमित्ताने आमदार अतुल बेनके यांनी सर्वांना केले आहे.

यावेळी आमदार अतुल बेनके, समितीचे सदस्य म्हणून आमदार ॲड. अशोक बापू पवार, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक पुणे एन आर प्रविण, सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर अमित भिसे, दक्षता विभागीय वन अधिकारी धोत्रे, वन परिक्षेत्र अधिकारी जुन्नर प्रदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, वन परिक्षेत्र अधिकारी शिरूर, प्रताप जगताप यांसह इतर सह अधिकारी वर्ग उपस्थित होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे