दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
1 min read
निमगाव सावा दि.३१:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालय निमगावसावा (ता. जुन्नर) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती साजरी करण्यात आली. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन केले.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना त्यांनी “अहिल्यादेवी होळकर यांनी आपली अपूर्व धर्मशीलता, उदात्त सुशीलता, नि: सीम कर्तव्यदक्षता, विलक्षण कार्यक्षमता, अद्भुत तेजस्विता, आणि प्रशंसनीय उद्यमशीलता इत्यादी सद्गुणांच्या योगाने हिंदुस्थानातील पुण्यश्लोक व महाप्रतापी बनून रयतेच्या हिताचा राज्यकारभार केला.
दळणवळणाची साधने नसतानाही तीर्थक्षेत्री तलाव, विहिरी, मंदिरे, धर्मशाळा बांधल्या. काही लढायात त्यांनी स्वतः सैन्याचे नेतृत्व केले. उचित न्यायदानासाठी सुद्धा त्या प्रसिद्ध होत्या.
अहिल्यादेवींनी हिंदू मंदिराचा जिर्णोद्धार केला. धर्मशाळा, पाणपोया बांधल्या, काशी, गया, सोमनाथ, अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, रामेश्वर, जगन्नाथ पुरी, पंढरपूर ,औंढा नागनाथ अशा अनेक ठिकाणी त्यांनी नदी घाट बांधले. हिंदू मंदिरांचा जिर्णोद्धार केला.
धर्मशाळा उभ्या केल्या. दळणवळणाची साधने नसतानाही तीर्थक्षेत्री तलाव, विहिरी बांधल्या. शेतकऱ्यांना गोपालनाचे महत्त्व समजून दिले.कलाकारांना आश्रय दिला. अनेक विषयाचे विद्वान, शास्त्री, पंडित, वैद्य, व्याकरणकार , कीर्तनकार यांना त्यांनी राजाश्रय दिला.
महेश्वर नगरी संस्कृती विद्वानांचे व धर्माचे माहेरघर म्हणून नावारूपाला आली. कित्येक ग्रंथांची हस्तलिखिते त्यांनी तयार करून घेतली. भिल्ल लोकांना सैन्यात सामावून घेतले. चोर दरोडेखोर यांचे मतपरिवर्तन केले. ते लोक शेती करू लागले. संस्कृत पाठशाळा सुरू केल्या. अन्नछत्रे घातली. योग्य शासक व संघटक त्या होत्या. लोकांनी त्यांना संतांच्या दर्जा दिला. त्यांनी कल्याणकारी राज्य केले.
अहिल्यादेवी यांच्या सद्गुनाप्रमाणे आपण वर्तन ठेवावे त्यांचा आदर्श समोर ठेऊन कार्य करावे. असा उपदेश केला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संदीपान पवार, संचालक दत्ता घोडे, बाळासाहेब गाडगे, रानमळ्याचे माजी सरपंच सुरेश तिकोणे, प्राचार्य प्रल्हाद शिंदे सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.