धनिक बापाच्या अल्पवयीन बबड्याने मद्यपार्टीत दोन तासांत उडवले ४८ हजार
1 min read
पुणे दि.२२:- पुणे येथे दोघांचा जीव घेणाऱ्या बड्या बापाच्या अल्पवयीन मुलाने आलिशान कारच्या अपघातापूर्वी केलेल्या पार्टीत दोन तासांत मद्य व जेवणावर मित्रांसोबत तब्बल ४८ हजार रुपये उडवले असल्याची माहिती त्यानेच पोलिसांना दिली आहे.
अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने वाहन चालवून केलेल्या अपघातात दोन जणांना जीव गमवावा लागला. या अल्पवयीन बाळाने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. मित्रांबरोबर तो रविवारी रात्री पार्टी करण्यासाठी गेला होता. पार्टीला जाताना त्याने वडिलांकडून पोर्शे ही महागडी कार घेतली होती.
मुलगा मद्यप्राशन करतो, याची माहिती बांधकाम व्यावसायिक वडिलांना होती. अल्पवयीन मुलगा व त्याच्या मित्रांनी हॉटेल कोझी आणि हॉटेल ब्लॅकमध्ये मद्य प्राशन केले. तेथे त्यांनी जेवण केले. दोन तासांत मुलाने मद्यपार्टीवर ४८ हजार रुपये खर्च केला. पोलिसांनी दोन्ही हॉटेलमधील चित्रीकरण तपासले.
तेव्हा मुलगा आणि त्याचे मित्र मद्यप्राशन करीत असल्याचे दिसून आले आहे. हॉटेलमधील बिल मुलाने ऑनलाइन दिल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी ऑनलाइन बिल अदा केल्याच्या नोंदी तपासासाठी ताब्यात घेतल्या आहेत. पोलिसांनी मुलाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी ससून तसेच खासगी रुग्णालयात पाठविले आहेत. अद्याप रक्त तपासणी अहवाल पोलिसांना मिळालेला नाही.