महादेव ॲप प्रकरण, ४५२ पासबुक, ४५ लॅपटॉप,८९ मोबाईल,आरोपी १०१, एकून ६२ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

1 min read

नारायणगाव दि.१७:- नारायणगाव (ता.जुन्नर) येथे महादेव ॲप प्रकरणामध्ये तब्बल ४५२ पासबुक व चेकबुक वापरण्यात आले, ४५ लॅपटॉप,८९ मोबाईल, आरोपींचे १०१ मोबाईल, चार्जर, डि व्ही आर,राउटर , टेबल खुर्च्या, बेड,फर्निचर असा एकून ६२ लाख ७४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात ३ आरोपी अद्यापही फरार आहेत.

नारायणगाव येथील व्हिजन गॅलक्सी या कम्लेक्स मधील एका इमारतीमध्ये महादेव बुक व लोटस ३६५ या ॲपद्वारे ऑनलाइन सट्टा खेळविणाऱ्या ९३ जणांपैकी पाच जणांना गुरुवार दि. १६ मे रोजी जुन्नर न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कुणाल सुनील भट, समीर युनुस पठाण, नियाज अहमद जाफर हसनेन, मोहम्मद हसन रेजा नूर आलम आणि तौकीर अहमद मजहर उल हक अशी या पाच जणांची नावे आहेत. उर्वरित ८८ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. यातील मुख्य आरोपी प्रसिद्ध व्यापारी ऋतिक सुरेश कोठारी (रा. नारायणगाव, ता. जुन्नर) व दुसरा आरोपी राज बोकरिया (रा. जुन्नर) हे दोघे आणि सलमान मिराजकर पठाण (रा. जुन्नर) फरारी झाले असून, त्यांना शोधण्यासाठी दोन पथके रवाना केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.दरम्यान, ९३ आरोपीं पैकी ३ जण अल्पवयीन असल्याने त्यांना सुधारगृहात दाखल करण्यात येणार आहे. एकूण आरोपींपैकी ५ जणांनाच जुन्नर न्यायालयात हजर केले होते, तर उर्वरित आरोपींची घटना घडलेल्या ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्यात आली. न्यायालयीन कोठडी मिळालेल्या आरोपींचा जामीन अर्ज जुन्नर न्यायालयाने फेटाळल्याने त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव शहराच्या मध्यभागी हा ऑनलाइन पद्धतीने सट्टा खेळला जात होता. फेब्रुवारी 2024 पासून हा सर्व प्रकार या इमारतीमध्ये सुरू होता. मात्र आजूबाजूला याबाबतची माहिती कुणालाही नव्हती. या इमारतीमध्ये कामगारांना राहण्याची व जेवणाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे इमारती बाहेर सहसा यांचे जाणे होत नसायचे.स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने याबाबतची माहिती मिळल्यावर पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे