दहावी-बारावीचा निकाल ५ जूनपूर्वीच लागणार!
1 min read
पुणे दि.१५:- इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिकांची तपासणी युद्धपातळीवर सुरु आहे. आतापर्यंत दोन्ही वर्गाच्या सर्वच विषयांच्या जवळपास ८५ टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत.
प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण यापूर्वीच शाळांनी ऑनलाइन पद्धतीने बोर्डाला पाठविले आहेत. दरवर्षी पहिल्यांदा बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात तर दहावीचा निकाल दुसऱ्या आठवड्यात जाहीर होतो.
पण, यंदा दोन्ही वर्गांचे निकाल ५ जूनपूर्वीच जाहीर होतील, अशी सद्य:स्थिती असल्याचे बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
कॉपीमुक्त परीक्षेसाठी आता दहावी व बारावीच्या प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक असणार आहेत. या पार्श्वभूमीवर जुलैमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत की नाहीत याची विशेष मोहीम घेऊन खात्री केली जाणार आहे. बोर्डाचे अधिकारी प्रत्येक केंद्राला भेटी देतील आणि तेथील स्थितीचा अहवाल बोर्डाला सादर करतील.