‘उमंग सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा’ तालुकास्तरीय स्पर्धेत गुळुंचवाडी शाळेचे वर्चस्व

1 min read

गुळुंचवाडी दि.१:- पंचायत समिती जुन्नर, हंस फाउंडेशन व शिक्षणा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘उमंग प्रश्नमंजुषा तालुकास्तरीय स्पर्धा’ 2024 आदिवासी समाज प्रबोधिनी जुन्नर येथे संपन्न झाली. या स्पर्धेत जुन्नर तालुक्यातील दहा बीटमधील प्रत्येक बीटमधून प्रथम क्रमांक मिळवलेल्या मोठ्या गटातील दहा शाळांनी सहभाग घेतला होता. शिक्षणा फाउंडेशनचे व्यवस्थापक रवी राजनहिरे, संदिप मरभळ, अंकिता ढमढेरे, समन्वयक रामदास दाभाडे, आदेश जगताप, सौरभ दिघे, महेश नायकोडी व स्वयंसेवकांनी अतिशय उत्तम नियोजन करून ही स्पर्धा निकोप व खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पाच वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये शुभारंभ फेरी, रॅपिड फायर, एलिमिनेशन फेरी, डबल डिप व विजेती फेरी अशा पाच फेऱ्या घेण्यात आल्या.या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळुंचवाडी शाळेतील गौरी देवकर, सार्थकी शिंदे,आर्या गुंजाळ, मयांक भांबेरे, तनुजा गुंजाळ या पाच विद्यार्थ्यांनी उत्तम प्रदर्शन करून संपूर्ण जुन्नर तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवून गुळुंचवाडी शाळेच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला.हंस फौंडेशन व शिक्षणा फौंडेशन या संस्थेच्या वतीने व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना आकर्षक चषक व मेडल बक्षीस देण्यात आले. या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर जाधव यांना उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून आकर्षक चषक देवून गौरवण्यात आले. स्पर्धा समाप्तीनंतर सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांसाठी संस्थेच्या वतीने सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून (उपस्थिती, स्वच्छता, अभ्यास, शालेय स्पर्धा) स्टार नावाची संकल्पना या संस्थेने तालुक्यातील शाळांमध्ये राबवली. विद्यार्थ्यांना शालेय परिपाठामध्ये हिरव्या, चंदेरी व गुलाबी रंगाचे स्टार शिक्षकांच्या हस्ते वाटप केले जातात. त्याचबरोबर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित पूरक पुस्तिका स्वयंअध्ययनासाठी या संस्थेने वाटप केले आहेत. या यशाबद्दल जुन्नर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे व आणे केंद्राच्या केंद्रप्रमुख व गुळुंचवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुऱ्हाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंगनाथ भांबेरे, उपाध्यक्ष चंचल गुंजाळ, व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायत गुळुंचवाडी चे लोकनियुक्त सरपंच अतुल भांबेरे. उपसरपंच शांताराम गुंजाळ, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, ग्रामस्थ यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करून अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना सरिता मटाले, अशोक बांगर, ज्योती फापाळे, ज्ञानेश्वर जाधव, नरजहाँ पटेल या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुऱ्हाडे यांनी संस्थेचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे