सुलतानपूरची समृद्धी आतकरी रत्नागिरी जिल्हा वनरक्षक पदी; शेतकऱ्याच स्वप्न पूर्ण
1 min read
जुन्नर दि.२१:- सुलतानपूर (ता.जुन्नर) च्या शेतकऱ्याच्या मुलीने वनरक्षक पदाला गवसणी घातली असून तिने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे.सुलतानपूर येथील शेतकरी संदीप गोपाळा आतकरी यांची कन्या समृद्धी संदीप आतकरी हिची रत्नागिरी जिल्हा वनरक्षक पदी निवड झाली आहे. वनरक्षक पदाला गवसणी घालून तिने आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.या भरतीसाठी झालेल्या परीक्षेत समृद्धीने ई.डब्ल्यू. एस. प्रवर्गातून परीक्षा दिली होती. तिला 200 पैकी 172 मार्क्स मिळाले. तिचे प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथमिक शाळा सुलतानपूर, माध्यमिक शिक्षण पंडीत नेहरू विद्यालय निमगाव सावा येथे झाले. सध्या ती दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा, (ता.जुन्नर) येथे कला शाखेत द्वितीय वर्षांमध्ये शिक्षण घेत आहे.
समृद्धीने जिद्द व चिकाटीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश मिळवून इतरांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. तिने दोन वर्ष अभ्यास करून घवघवीत यश संपादन करून वनरक्षक ही पदवी मिळवली आहे.तिच्या या यशाबद्दल श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक व पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, पांडुरंग पवार यांनी अभिनंदन केले व तिला शुभेच्छा दिल्या.
तसेच वळसे पाटील महाविद्यालय संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, सचिव परेश घोडे,निमगाव सावा गावचे सरपंच किशोर घोडे, सर्व संचालक,प्रतिनिधी कविता पवार, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. छाया जाधव, सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी तीला शुभेच्छा दिल्या. तिच्या या यशाबद्दल परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.