डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटरच्या संचालिका डॉ. पिंकी कथे यांना ‘तेजस्विनी पुरस्कार २०२४’ प्रदान
1 min read
जुन्नर दि.१५:- ८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ महिला विकास मंच, जुन्नर यांजकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले व जागतिक महिला दिन जुन्नर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला. यानिमित्ताने जुन्नर तालुक्यातील कर्तृत्ववान व प्रसिद्ध महिला रेडिओलॉजिस्ट. डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटरच्या संचालिका डॉ. पिंकी कथे यांना ‘तेजस्विनी पुरस्कार २०२४’ देऊन गौरविण्यात आले. डॉ.पिंकी कथे या उत्तर पुणे जिल्ह्यातील रेडिओलॉजी क्षेत्रातील पायोनियर असून २००७ मध्ये त्यांनी डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटर या नावाने स्वतःचे पहिले डायग्नोस्टिक सेंटर नारायणगाव या ठिकाणी सुरु केले.
डॉ. पिंकी कथे यांचा आजवरचा प्रवास खूपच प्रेरणादायी असून आज डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटरच्या एकूण ७ हुन अधिक शाखा कार्यरत असून एकाच छताखाली अनेकविध डायग्नोस्टिक सुविधा उपलब्ध असलेलं ग्रामीण भागातील हे एकमेव डायग्नोस्टिक सेंटर आहे. यामागे डॉ. पिंकी कथे यांची मोठी मेहनत, चिकाटी व सातत्य आहे.
त्यांच्या याच कार्याचे कौतुक आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाची पोचपावती म्हणून त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले असून जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनावणे यांच्या शुभहस्ते आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर यांच्या विशेष उपस्थितीत डॉ. पिंकी कथे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
डॉ. पिंकी कथे यांनी राजमाता जिजाऊ महिला विकास मंचचे आभार मानले असून त्यांच्या या सन्मानाचे श्रेय त्यांनी जुन्नर तालुक्यातील जनतेला दिले आहे. या प्रसंगी बोलताना आजवरच्या प्रवासामध्ये आपल्या कुटुंबाची आपल्याला कायमच साथ मिळालेली असून, या यशात त्यांचा देखील सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
दरम्यान या कार्यक्रमासाठी डॉ. पिंकी कथे यांच्यासोबतच डॉ. पंजाबराव कथे, राजमाता जिजाऊ महिला विकास मंचाच्या अध्यक्षा अलका फुलपगार, सुमित्रा शेरकर आणि मंचाच्या सर्व महिला सदस्या यांची उपस्थिती लाभली.