पराशर मार्फत कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास; विद्यार्थ्यांनी अनुभवली ग्रामीण कृषी संस्कृती
1 min read
बेल्हे दि.१३:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, बेल्हे (ता.जुन्नर) यांच्या संयुक्त विद्यमाने “नेतृत्व गुणविकास” या विषयावर दोन दिवसीय विद्यापीठ स्तरीय मूल्यशिक्षण कार्यशाळेचे आयोजन नुकतेच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे करण्यात आले होते. प्रसिद्ध इतिहास लेखक डॉ.लहुजी गायकवाड यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस फुले व पुष्पहार अर्पण करून या कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, पराशर कृषी पर्यटन केंद्र राजुरी चे संस्थापक अध्यक्ष मनोज हाडवळे.
पुणे जिल्हा राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.श्रीकांत फुलसुंदर,समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्सचे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नेतृत्व गुणविकासाबरोबरच नैतिक मूल्यांचे शिक्षण मिळावं या हेतूने ही विद्यापीठस्तरीय मूल्यशिक्षण कार्यशाळा आयोजित केली असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली.विद्यार्थ्यांशी चर्चात्मक संवाद साधत प्रसिद्ध इतिहास लेखक प्रा.लहुजी गायकवाड यांनी “इतिहासातील उत्कृष्ट नेतृत्व केलेल्या व्यक्तींची गुणवैशिष्ट्ये” या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
पुणे जिल्हा समन्वयक डॉ.श्रीकांत फुलसुंदर म्हणाले,की तारुण्याचा वन्स मोअर पुन्हा नाही.व्यक्तिमत्त्वाचा विकास करताना श्रमाला देखील प्रतिष्ठा द्यावी.प्रभावी नेतृत्वासाठी आवश्यक असलेले २१ नियम यावर कार्पोरेट ट्रेनर प्रा.राजीव सावंत यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.त्यानंतर विद्यार्थ्यांशी गटचर्चेच्या माध्यमातून नेतृत्व करत असताना येणारे प्रसंग, वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा या सर्वांचे विद्यार्थ्यांवर होणारे परिणाम याबाबत सॉफ्ट स्किल ट्रेनर डॉ.महेश भास्कर यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधले.
उत्तम नेतृत्व करण्यासाठी आवश्यक गुण व कौशल्ये या विषयावर प्रा.रतिलाल बाबेल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. युवा उद्योजक दत्ता येवले यांनी उद्योजकीय नेतृत्वाचे पैलू या विषयावर मार्गदर्शन केले. समाजाची गरज ओळखून मनुष्यबळाला एकत्र घेऊन एखादा व्यवसाय सुरू करणं आणि त्यातून व्यावसायिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणे ही काळाची गरज असल्याचं युवा उद्योजिका कविता ढोबळे यावेळी म्हणाल्या.
ग्रामीण भागातील कृषी संस्कृती,परंपरा याची महती विद्यार्थ्यांना समजावी या उद्देशाने राजुरी येथील पराशर कृषी पर्यटन केंद्रास भेट दिली.कृषी पर्यटनाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न मनोज हाडवळे यांनी केला आहे.लाकडी पुल,फुलझाडे,वृक्ष,फळ-झाडे टाकाऊ वस्तूंचा तसेच पारंपारिक जुन्या वस्तूंचा वापर केलेला आहे.
विविध पक्ष्यांचा किलबिलाट व चिमण्यांचा चिवचिवाट ऐकून नवीन जगात आल्याची अनुभूती विद्यार्थ्यांना आली.पर्यटकांसाठी लाकडी खुर्च्या,बाक,टेबल बनवलेले आहेत.किचन गार्डनिंग,पराशर कुटी,जुन्या काळातील शेती औजारे,लाकडी वस्तू व शेणाने सारवलेली जमीन, भोजनव्यवस्था अगदी सर्व गोष्टी ग्रामीण भागातील आहेत. बैलगाडी व ट्रॅक्टरमधून शेत शिवारात फेरफटका, पेंटिंग,योग,मेडिटेशन,ध्यानधारणा असे अनेक उपक्रम या ठिकाणी घेतले जातात.
कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास जपणारे ‘पराशर कृषी पर्यटन केंद्र’ ग्रामीण भागाची खरी कृषी संस्कृती जपत असून विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात पर्यटनाच्या अनेक संधी आहेत असे यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना मनोज हाडवळे म्हणाले.ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.दिनेश जाधव,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.गणेश बोरचटे,प्रा.गौरी भोर, प्रा.रुपेश कांबळे,प्रा.सचिन भालेकर यांनी परिश्रम घेतले.