समर्थच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले जुन्नरचे पर्यटन वैभव

1 min read

बेल्हे दि.९:- राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जुन्नर चे वैभवशाली पर्यटन जवळून पाहता यावे यासाठी समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने पर्यटन दौऱ्याचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी किल्ला,अंबा अंबालिका लेणी, नाणेघाट या ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना सिद्धार्थ कसबे यांनी गाईड म्हणून मार्गदर्शन केले. शिवनेरी किल्ल्यावर पोहचल्यानंतर महादरवाजा पासून ते सर्व सात दरवाजे,त् यावर असलेल्या शरभ शिल्प,दरवाजांची रचना,बांधकाम शैली,त्यांचा इतिहास याबाबत माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.पुढे शिवाई देवीचे मूळ मंदिर त्यामागील इतिहास व तेथे कोरलेली लेणी यांची माहिती दिली. अंबरखाना,जन्मस्थळ,त्याठिका णी असलेली त्याकाळची खापराची पाईप लाईन, कारंजे,बदामीतलाव त्यातील दगडांचा वापर कुठे केला या संदर्भातील सर्व माहिती विद्यार्थ्यांना दिली.नंतर अंबा अंबालिका लेणी, भूत लेणी,भीमाशंकर लेणी यांचा असलेला दोन हजार वर्षांपूर्वी चा इतिहास त्याबद्द्ल ची माहिती सांगितली.विशेष म्हणजे एकाच दिवसात विद्यार्थी प्राचीन धम्मलिपीची अक्षरे ओळखायला व वाचायला शिकली. नंतर नाणेघाट मध्ये गेल्यावर नाणेघाटाच्या निर्मितीचा इतिहास,तेथील रांजण,लेणी,लेण्यांमध्ये कोरलेल्या प्राकृत भाषा व धम्म लिपी चे वाचन करून माहिती दिली.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीचा पहिला पुरावा जुन्नर येथील नाणेघाटाच्या भिंतीवर कोरलेला मराठी भाषेचा उल्लेख असलेला प्राचीन शिलालेख दिसून येतो.जुन्नर म्हणजे प्राचीन शिलालेख आणि ऐतिहासिक लेण्यांचा वारसा असलेला महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका असल्याचे यावेळी सिद्धार्थ कसबे म्हणाले.परतीच्या प्रवासादरम्यान नाणेघाटाच्या कड्यावरून मुलांनी सुर्यास्त होतानाच्या दृश्याचा आनंद घेतला. पुणे, नगर आणि नाशिक विभागातून एकूण १०० विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या शिबिरासाठी जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे संस्थापक मनोज हाडवळे, यश मस्करे, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.भूषण दिघे,प्रा.अश्विनी खटिंग,प्रा.दिनेश जाधव,प्रा.गौरी भोर, प्रा. सचिन भालेकर यांचे विशेष योगदान व सहकार्य मिळाले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे