मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज वढू येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचे करणार भूमिपूजन
1 min read
शिरूर दि.२:- स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक दर्जाच्या स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि.२) होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शंभूभक्तांच्या मागणीला मूर्त स्वरूप अखेर प्राप्त होत असल्याने शंभूभक्तांमध्ये नव चेतना निर्माण होणार आहे.या स्मारकासाठी माजी आमदार स्व. बाबुराव पाचर्णे, माजी खासदार व म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार अॅड. अशोक पवार यांच्यासह वढू बुद्रुक – तुळापूर ग्रामपंचायतीसह पुणे जिल्हा परिषद यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळे हे काम मार्गी लागत आहे.
स्व. आमदार बाबूराव पाचर्णे यांनी या समाधीस्थळाचे काम भव्यदिव्य व्हावे, यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्यासह तत्कालीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदिप कंद यांच्या माध्यमातून विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरु केले. बाबुराव पाचर्णे यांनी तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मदतीने आराखडा राज्य शासनाकडे पाठविला.
यावेळी राज्य शासनाने १७९ कोटी ५ लाख १२३ रुपयांचा विकास आराखडा तयार केला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना या स्मारकाचा आंतरराष्ट्रीय पद्धतीचा विकास आराखडा तयार केला जावा, अशी आग्रही मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार अॅड. अशोक पवार यांनी केली होती.
स्मारकाचा आंतरराष्ट्रीय विकास आराखडा सादर झाल्यावर त्यास सरकारने मंजुरी दिल्यावर अजित पवार यांनी यासाठी ३८९ कोटी निधीची तरतूद केली. शासनाने आर्किटेक्टमध्ये स्पर्धा घेतली होती. त्यातील तीन आराखड्यांचे सादरीकरण केले होते.