शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती उत्साहात साजरा; उद्याच्या अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
1 min read
शिवनेरी दि.१९:- मराठा आरक्षणासाठी मंगळवारी (दि.२०) विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. ओबीसी आणि इतर समाज घटकाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे. उद्याच्या अधिवेशनातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ”शासनाने दांडपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित केले आहे.
तसेच लवकरच लंडनहून वाघनखं महाराष्ट्रात आणणार आहोत. शिवरायांना अभिप्रेत असलेलं सुराज्य आपल्याला निर्माण करायचं आहे.”शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होत छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन केले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांच्या जन्माचा पाळणा गायला. तसेच यानंतर बाल शिवाजी राजांची वाजत गाजत पालखी काढण्यात आली. तसेच किल्ल्यावर शिवाजी महाराजांबद्दल माहितीपर पोवाडे, नाटकं यांचे सादरीकरण करण्यात आलं.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवनेर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यंदाचा मानाचा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार हा पोलीस दलातील कार्यक्षम अधिकारी दिलीप भुजबळ यांना प्रदान करण्यात आला. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जगभरात साजरी होत असते. यानिमित्ताने जगभरातून अनेक शिवप्रेमी किल्ले शिवनेरीवर येऊन नतमस्तक होतात.
यावेळी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके,आशाताई बुचके, माजी खा. शिवाजी आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे यांसह पुणे जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.