आणे पठारावरील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्याना मिळाली मायेची ऊब

1 min read

आणे दि.१४:- जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणे (ता.जुन्नर) परिसरातील शाळांमध्ये AFFINITY X या कंपनीच्या CSR निधीतून, ऊर्मी संस्था पुणे व दुर्गसंवर्धन प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्याना हुडी स्वेटर, विज्ञानाचे किट, व खाऊ वाटप करण्यात आले.नळवणे येथे पाहुण्यांचे ढोल लेझीम पथकाद्वारे वाजत गाजत स्वागत करण्यात आले व फेटे बांधून सन्मान करण्यात आला. आदिवासी समाजाची वस्ती असणाऱ्या नवलेवाडी, सुरकुलवाडी येथील पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. जि.प. शाळा आनंदवाडी, शिंदेवाडी, व्हरुंडी, पेमदरा, भोसलेवाडी अशा ६ शाळांतील २०० विद्यार्थांना स्वेटर व इतर साहित्य वाटप करण्यात आले. सर्व शाळामधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून पाहुण्यांनी गौरवोद्गार काढले. शिंदेवाडीची सुंदर शाळा, आनंदवाडीतील विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी, पेमदरा येथील विद्यार्थ्यांचे गायन कौशल्य व भोसलेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे नृत्य कौशल्य पाहून पाहुणे भारावून गेले.भोसलेवाडी शाळेतील विद्यार्थ्याना नृत्यकौशल्यासाठी पाहुण्यांनी ५ हजार रुपये बक्षीस दिले. स्वेटर वाटप कार्यक्रमासाठी AFFINITY X कंपनीचे संतोष जाधव, उर्मी संस्थेचे राहुल शेंडे व दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान चे प्रतिनिधी व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. जुन्नर तालुक्यातील १ हजार ७०० गरीब गरजू मुलांना मदत मिळवून देण्यासाठी ऊर्मी संस्था पुणे चे राहुल शेंडे, दुर्ग संवर्धन चे संतोष जाधव. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे मार्गदर्शक संजय डुंबरे, जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे, जुन्नर तालुका अध्यक्ष रमाकांत कवडे, सभापती संतोष पाडेकर व शिक्षक नेते भरत बोचरे, राम संभेराव, विश्वनाथ नलावडे व दुर्गसंवर्धन प्रतिष्ठानचे सर्व प्रतिनिधी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. पुढील काळातही आणे पठारावरील शाळांमधील विद्यार्थ्याना शैक्षणिक मदत करण्याचे पाहुण्यांनी आश्वासन दिले. आणे केंद्राच्या वतीने सुभाष दाते व महेश साबळे यांनी पाहुण्यांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे