मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपचार घेण्यास दिला नकार
1 min readजालना, दि.१४- एकीकडे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असताना, मराठा दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीत सुरु केलेल्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. मात्र, मागील चार दिवसांत त्यांनी अन्न, पाणी घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. अनेकांनी विनंती करून देखील पाणी घेण्यास मनोज जरांगे यांनी नकार दिला आहे. मंगळवार सकाळपासून जरांगे यांचे हात थरथरतायत, बोलण्यास देखील त्रास होत आहे. त्यामुळे त्यांची अशी सर्व परिस्थिती पाहून त्यांच्या सहकाऱ्यांची चिंता वाढली आहे.सोमवारी दुपारी डॉ. सुयोग उगले यांनी उपोषणाच्या व्यासपीठावर जाऊन जरांगे पाटलांना उपचार घेण्यासाठी विनंती केली. तेव्हा ते झोपलेले होते. डॉक्टरांना पाहताच त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. तथापि, त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र जरांगे पाटील तपासणीच करू देत नसल्यामुळे डॉक्टरांचीही अडचण झाली आहे. सोमवारी रात्री जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी देखील जरांगे यांना पाणी घेण्याची विनंती केली. मात्र, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आपण उपोषण सोडणार नसून, पाणी देखील पिणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. तर, काल रात्रीपासून जरांगे यांची प्रकृती खालवल्याने त्यांचे जवळचे सहकारी चिंताग्रस्त झाले आहेत.