आणे येथे ग्रामसभेत हाणामारी: मोकाट डुकरांच्या त्रासामुळे शेतकरी आक्रमक
आणे दि.७: आणे (ता.जुन्नर) येथे २६ जानेवारीला कोरम अभावी तहकूब करण्यात आलेली ग्रामसभा मंगळवारी (दि.६) घेण्यात आली. ग्रामसभेचे कामकाज सुरळीत चालू होते. सभेमध्ये ग्रामस्थांच्या आलेल्या अर्जांवर चर्चा सुरू होती. यावेळी रामदास बबन दाते यांचा गावातील पाळीव डुकरे शेतीला त्रास देत असून शेतमालाचे प्रचंड नुकसान करतात.
त्यांचा बंदोबस्त करावा. असा अर्ज चर्चेसाठी आला असता, सदर डुकरांच्या मालकाला ग्रामसभेत बोलावण्याची मागणी करण्यात आली. सरपंच प्रियांका दाते यांनी डुकरांच्या मालकाला दूरध्वनी करून सभेत हजर राहण्यास सांगितले. सदर व्यक्ती ग्रामसभेत आल्यानंतर अर्जदार व त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
त्याचवेळी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तेही या भांडणात सहभागी झाले. नुकसानग्रस्त शेतकरी व डुकरांचा मालक यांच्यात जोरदार धुमचक्री झाली, बोलण्याचे रूपांतर हाणामारीत झाले. झाले. मात्र सरपंच प्रियांका दाते, उपसरपंच सुहास आहेर, उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
या गदारोळातच सरपंचांनी ग्रामसभा संपल्याचे जाहीर करून ग्रामस्थांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितले.
“गावातील मोकाट डुकरांचा आमच्या शेतीला नेहमीच उपद्रव होत असून गहू, मका, ज्वारी, वाटाणा अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ग्रामपंचायतीला अनेक वेळा अर्ज करून काहीही कारवाई केली जात नाही. या डुकरांचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्हाला ग्रामपंचायतीकडून नुकसान भरपाई मिळावी.”
रामदास दाते, पीडित शेतकरी
“मोकाट डुकरांच्या मालकाला सांगून त्यांचा बंदोबस्त केला जाईल, परंतु ग्रामस्थांनी भांडणे व मारामाऱ्या करून कायदा हातात घेऊ नये.”
प्रियांका दाते, सरपंच, आणे